महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रेम न करण्याचा निर्धार केलेला 'मनमौजी'च्या रिलीजची तारीख ठरली - MANMAUJI TRAILER RELEASE

Manmauji Trailer release : मुलींचा तिरस्कार करणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात जेव्हा 2-2 सुंदर मुली येतात तेव्हा काय घडतं याची गोष्ट असलेला 'मनमौजी' प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Manmauji
'मनमौजी'च्या रिलीजची तारीख ठरली (Manmauji poster)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 24, 2024, 8:08 PM IST

मुंबई - १९६२ साली 'मनमौजी' नावाचा हिंदी चित्रपट येऊन गेला. यात किशोर कुमार आणि साधना प्रमुख भूमिकामध्ये होते. आता त्याच नावाचा मराठी चित्रपट येऊ घातलाय आणि प्रमुख भूमिकांत आहेत भूषण पाटील आणि सायली संजीव. मनापासून मौज करणाऱ्याला 'मनमौजी' म्हटले जाते, परंतु या चित्रपटातील नायक प्रेमापासून दूर राहत असतो. कर्मधर्मसंयोगाने त्याच्या जीवनात दोन मुली येतात आणि त्याच्या आयुष्यात पूर्णतः उलथापालथ होते.



नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून त्यातून हा चित्रपट मनोरंजनात्मक असणार याची कल्पना येते. तसेच चित्रपटातील कथा फक्त प्रेमकहाणीपुरती मर्यादित नसून, त्यात अनेक भावनिक आणि मनोरंजक पैलू देखील आहेत, हे ट्रेलरमधून स्पष्ट होते.

कसा आहे मनमौजीचा ट्रेलर...

मुलींपासून दूर राहू पाहणाऱ्या भूषण पाटीलच्या आयुष्यात सायली संजीव येते आणि त्याच्या मनावर प्रेमाची फुंकर बसते. प्रेम फुलू लागत असतानाच त्याच्या ऑफिसमध्ये तरुण लेडी बॉस रिया नलावडे येते. या सुंदरीच्या प्रेमाच्या जाळ्यात तो अडकतो का आणि त्याचा प्रेमावरचा विश्वास का डळमळतो याचं सुंदर चित्रण ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. फ्रेश जोडीची ही सुंदर प्रेमकथा प्रेक्षकांना भुरळ घालेला का हे पाहावं लागणार आहे.



मनमौजी चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये भूषण पाटील, सायली संजीव, नवोदित रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि भाऊ कदम यांचा सहभाग आहे. गोल्डन गेट मोशन पिक्चर्सचे विनोद मलगेवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी त्यांनी 'गुलाबजाम' आणि 'लॉस्ट अँड फाऊंड' यासारख्या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. शीतल शेट्टी यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून, संवाद लेखन हृषिकेश जोशी यांनी केलं आहे. सिनेमॅटोग्राफीची धुरा प्रसाद भेंडे यांनी सांभाळली आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी चित्रपटातील गीतं लिहिली आहेत, तर संगीताची जबाबदारी अमितराज आणि पंकज पडघन यांनी घेतली आहे.



'मनमौजी' हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. फिल्मास्त्र स्टुडिओज यांनी या चित्रपटाचं वितरण केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details