मुंबई - अल्लू अर्जुन आणि 'पुष्पा 2 द रुल' चे निर्माते तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंती रेड्डी यांची भेट घेणार आहे. तेलुगू चित्रपट निर्मात्यांचे एक शिष्ठमंडळही या भेटीत अल्लू अर्जुनबरोबर मुख्यमंत्र्यांच्या भेटीस येणार आहे. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली होती आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती. परंतु त्याला अंतरिम जामीन मिळाला आणि तो जेलच्या बाहेर आला आहे, परंतु हे प्रकरण अद्याप निकाली निघालेलं नाही. या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुन रेवंत रेड्डींची भेट घेत आहे.
'पुष्पा 2' च्या प्रीमियर दरम्यान झालेलेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर या घटनेला राज्य सरकारनं गंभीरपणे घेतलं आहे. संध्या थिएटरमध्ये प्रीमीयरसाठी अल्लू अर्जुन हजर राहणार होता. त्यावेळी त्याला पाहायला आलेल्या गर्दीत एक महिला लोकांच्या पायाखाली चिरडून मृत्यूमुखी पडली होती. मयत महिलेच्या बरोबर आलेल्या तिचा मुलगाही या गर्दीत चिरडला गेला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी घेतली आहे. मयत महिलेच्या कुटुंबीयांना 50 लाखाची मदतही त्यांनी देऊ केली आहे. मृत महिलेच्या पतीनेही खटला मागे घेण्याचे बोलले होते, मात्र आता हे प्रकरण राज्य सरकार आणि चित्रपट उद्योग यांच्यात अडकले आहे. असं असलं तरी पोलीसी कारवाईचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा फटका अल्लू अर्जुन आणि 'पुष्पा 2' च्या टीमला बसू शकतो.