मुंबई - Operation Valentine : वरुण तेजची भूमिका असलेल्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची टीम 14 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लेथपोरा कॅम्प येथील पुलवामा स्मारक स्थळाला भेट देणार आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवशी एका आत्मघाती बॉम्बरने आयईडीने भरलेल्या वाहनाला घेऊन जाणाऱ्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला केल्याने 40 शूर भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. एकाचवेळी 40 भारतीय सैनिकांना या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. या दिवसाचे स्मरण करण्यासाठी आणि वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची टीम पुलवामा स्मारक स्थळाला भेट देईल.
'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या चित्रपटाबद्दल बोलायचं तर हवाई दलातील वीरांच्या शौर्य आणि पराक्रमाभोवती याचे कथानक गुंफण्यात आलंय. देशाचे रक्षण करताना हवाई दलातील सैनिक कशा प्रकारच्या आव्हांनाचा मुकाबला करतात आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतात याचे थरारक चित्रण यात पाहायला मिळेल. सत्य घटनांपासून प्रेरित 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'चे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी केले आहे.