मुंबई - महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांना संगीतमय मानवंदना देणारा कार्यक्रम यंदाच्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला म्हणजे मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनी रंगला. यावेळी 'पद्मश्री' सोनू निगम यानं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) इथं त्याचे 'आयडॉल' मोहम्मद रफी यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. एन आर टॅलेंट अँड इव्हेंट मॅनेजमेंटने आयोजित केलेला 'सौ साल पहले' नावाचा कॉन्सर्ट हा सोनू निगमचा भारतातील मोहम्मद रफी यांना समर्पित केलेला पहिला शो असल्याचा आयोजकांचा दावा आहे. यामध्ये त्यांनी रफी साहब यांच्या क्लासिक गाण्यांतील सुमारे 50 सदाबहार गाण्यांचं सुरेल सादरीकरण केलं. या गाण्यांसाठी सोनूला 50 सदस्यांच्या लाइव्ह ऑर्केस्ट्राची साथ होती.
या खास प्रसंगी मोहम्मद रफी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते, त्यात त्यांचा मुलगा शाहिद रफी आणि सून फिरदौस रफी यांचाही समावेश होता. दिवंगत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुत्र रब्बानी मुस्तफा खान आणि त्यांच्या पत्नी नम्रता गुप्ता खान यांनी या हार्दिक श्रद्धांजलीसाठी यजमानाची भूमिका बजावली.
सोनू निगमनं सूरमयी संध्याकाळची सुरुवात बॅकस्टेज पूजेनं केली. मोहम्मद रफी यांना आदरांजली वाहण्यासाठी तो स्टेजवर आला आणि त्यानं आपल्या परफॉर्मन्सची सुरुवात केली. रफी यांनी आपल्या अद्वितीय स्वरांनी अजरामर केलेल्या 'तू कहीं आस पास है दोस्त', 'मेरा तो जो भी कदम', आणि 'दिल का सुना साज' सारख्या गाण्यांनी अक्षरशः माहोल बनवला.
पूर्ण खचाखच भरलेल्या NMACC ग्रँड थिएटरमधील प्रेक्षकांनी “वुई लव्ह यू, सोनू निगम!” अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी त्यानं ‘ये चांद सा रोशन चेहरा’, ‘मैंने पूछा चांद से’, ‘बहारों फूल बरसाओ’, ‘पुकारता चला हूँ मैं’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘परदेसियों से न आंखें मिलाना’, ‘दर्द-ए-दिल’, ‘ओ हसीना ज़ुल्फ़ों वाली’, ‘आजा-आजा' यासारखी रफी यांची अजरामर गाणी आपल्या शैलीत परफॉर्म केली.
एका भावोत्कट क्षणी सोनू निगमचे वडील अगम कुमार निगम यांनीही मंचावर येऊन दिग्गज गायकाला आदरांजली वाहिली. रफी साहेबांचा त्यांच्या जीवनावरील प्रभावावर प्रकाश टाकताना भावनिक सोनू निगम म्हणाला, “रफी साहब माझे संगीतातले पिता आहेत. माझ्या वडिलांनी मला रफी साहेबांच्या संगीताची ओळख करून दिली आणि रफी साहेबांनी मला आज मी जे काही आहे ते बनवले, रफी साहबांमुळेच मी आहे, माझं अस्तित्व आहे.”
या विशेष प्रसंगी रब्बानी मुस्तफा खान आणि नम्रता गुप्ता खान यांनी सोनू निगम यांना मोहम्मद रफी यांचा सुंदर पुतळा भेट दिला. “सोनू जी आमच्यासाठी एक कुटुंब आहे. 'सौ साल पहले' आयोजित करणे ही केवळ एक मोठी जबाबदारीच नाही तर नम्रता आणि माझ्यासाठी एक भावनिक प्रवासही होता. रब्बानी मुस्तफा खान यांनी सांगितलं की, "सोनूजींना अशा ऐतिहासिक प्रसंगी त्यांच्या 'आयडॉल'ची आठवण करून देणं आणि त्यांचा आत्मा त्यांना समर्पित करताना पाहणं हा अत्यंत भावनिक क्षण होता."
सोनू निगमने ‘सौ साल पहले’ आणि ‘हॅपी बर्थडे रफी साहब’ या गाण्यांनी अविस्मरणीय संध्याकाळची सांगता केली.
हेही वाचा -