मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला शनिवारी रात्री उशिरा ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. हा हल्लेखोर बांग्लादेशी होता. चोरीच्या उद्देशानं तो सैफच्या घरात घुसला होता. पोलिसांनी पत्रकार परिषदेत त्याचं नाव मोहम्मद शरीफुल शहजाद असं सांगितलं आहे. हा हल्लेखोर एका हाऊसकीपिंग फर्ममध्ये काम करत होता. त्याचं वय 30 वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीनं चौकशीदरम्यान सांगितलं की, तो अभिनेत्याच्या घरात घुसला होता हे त्याला देखील माहित नव्हते. त्याला फक्त तिथे चोरी करायची होती. मात्र जेव्हा सैफ त्याच्यासमोर आला, त्यावेळी त्यानं स्वसंरक्षणार्थ हल्ला त्याच्यावर केला होता. आता सैफला भेटण्यासाठी अनेकजण लीलावती रुग्णालयात पोहोचत आहेत.
तैमूर आणि जेह यांनी घेतली वडील सैफ अली खानची भेट :दरम्यान शर्मिला टागोर चौथ्या दिवशी आपल्या मुलाला पाहण्यासाठी लीलावती रुग्णालयात पोहोचल्या आहेत. या घटनेनंतर आज 19 जानेवारी रोजी तैमूर आणि जेह त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी आई करीना कपूरबरोबर रुग्णालयात गेले होते. आता करीना, तैमूर आणि जेह यांचे देखील काही रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये तैमूर आणि जेह कारमध्ये बसताना दिसत आहेत. याशिवाय, सैफची बहीण सोहा अली खान पती कुणाल खेमूबरोबर रुग्णालयच्या दिशेनं जाताना दिसत आहे.