मुंबई - 'रामायण: द लेजेंड ऑफ प्रिन्स राम' हा चित्रपट भारतातील थिएटरमध्ये रिलीज होण्याची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. या चित्रपटाच्या अधिकृत एक्स अकाउंटने चाहत्यांना त्यांच्या सोशल मीडिया पेजवरील आठवणींना उजाळा दिला आहे. महर्षि वाल्मिकींच्या महाकाव्यावर आधारित या जपानी अॅनिमेशन चित्रपटाच्या निर्मात्यांनी निर्मितीच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. जपानमधील कोइची सासाकी, यांनी प्रसिद्ध भारतीय अॅनिमेटर राम मोहन यांच्याबरोबर चित्रपटाचं सह-दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रम आणि सर्जनशीलतेची आठवण त्यांनी जागवली आहे.
कोइची सासाकी म्हणाले, "या चित्रपटाच्या अॅनिमेशन गुणवत्तेचा, त्यांच्या हालचाली आणि पात्रांच्या अभिव्यक्तीचा आम्हाला अभिमान आहे... चित्रपट केवळ दृश्यांनी बनवला जात नाही." "एखादा चित्रपट तेव्हा पूर्ण होतो जेव्हा त्यात उत्तम आवाज आणि शक्तिशाली संवाद असतात. या चित्रपटाचा आवाज १००% भारतात तयार करण्यात आला आहे, हे भारतातील सर्वोत्तम संगीतकार आणि अभिनेत्यांचे महान काम आहे, त्यासर्वांचा मी मनापासून आदर करतो", असे ते पुढे म्हणाले. "जर भारतातील लोकांना असे वाटत असेल की हे माझे आवडते रामायण आहे. यापेक्षा जास्त मोठा आनंद दुसरा असू शकत नाही."