मुंबई :अभिनेता वीर पहाडिया त्याच्या डेब्यू चित्रपट 'स्काय फोर्स'मुळे चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. वीरचा हा पहिला चित्रपट भारतीय वायू दलावर आधारित आहे. त्यानं 'स्काय फोर्स' चित्रपटामध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वीरला भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहलीच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, यानंतर त्यानं सांगितलं की, "जर चित्रपट निर्मात्याला कधी वाटले की, या भूमिकेसाठी मी योग्य आहे तर, यासाठी खूप मेहनत घेईल. मी हे आव्हान स्वीकारण्यास तयार आहे."
वीर पहाडियानं केलं विराट कोहलीचं कौतुक :वीरनं विराट कोहलीचं कौतुक करत पुढं म्हटलं, "विराट सर खूप महान आहेत, ते लीजेंड आहे. मला कामाबद्दल आवड, उत्साह आणि जिद्द असते. तुम्ही जे म्हणत आहात ते खूप रोमांचक आहे, खूप चांगलं आहे. आशा आहे की येत्या काळात जर तुम्हाला वाटत असेल की मी त्याच्या लायक आहे, तर मी खूप मेहनत करेन. जर निर्मात्यांनी कधी चित्रपट बनवला तर मला त्याचा भाग व्हायला आवडेल." याशिवाय दुसऱ्या एका मुलाखतीत वीर पहाडियानं म्हटलं होतं, "वास्तविक जीवनातील नायकांचे शोर्य आणि त्याग दर्शविणारी भूमिका साकरताना मला अभिमान वाटत आहे. अक्षय कुमारबरोबर काम केल्यानं माझे चित्रपटसृष्टीतील पदार्पण आणखीच विशेष बनले आहे."