मुंबई - Singer Palak Muchhal : गायिका पलक मुच्छल तिच्या 'सेव्हिंग लिटिल हार्ट्स' या फंडरेझर मोहीमेअंतर्गत हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या वंचित मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी पैसे गोळा करत आहे. 11 जून रोजी, पलकच्या पुढाकारातून 3000 वी शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया इंदूरच्या आठ वर्षांच्या आलोक साहूवर करण्यात आली. मंगळवारी, 11 जून रोजी पलकनं तिच्या इंस्टाग्रामवर आलोक साहूचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "3000 लोकांचे प्राण वाचले. आलोकसाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद." शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तो आता पूर्णपणे बरा आहे."
गायिका पलक मुच्छलचं मिशन :रिपोर्ट्सनुसार, पलक मुच्छलनं वयाच्या सातव्या वर्षी हे काम सुरू केलं होतं. एका मुलाखतीत तिनं तिच्या प्रवासाविषयी माहिती देताना म्हटलं होतं की, "जेव्हा मी हे मिशन सुरू केले, तेव्हा हा एक छोटासा उपक्रम होता. मी वयाच्या सातव्या वर्षीपासून यासाठी काम करत आहे आणि आता हे माझ्या आयुष्याचं एक मिशन बनलं आहे." पुढं तिनं सांगितलं, "माझ्या वेटींग लिस्टमध्ये अजूनही 413 मुले आहेत. मी करत असलेला प्रत्येक संगीत कार्यक्रम हार्ट सर्जरीला डेडिकेट असतो. ही एक जबाबदारी असल्यासारखे वाटते आहे. देवानं मला एक माध्यम म्हणून यासाठी निवडले आहे."