मुंबई - अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी तिच्या चाहत्यांसाठी तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अपडेट्स शेअर करत असते. अलीकडे तिचा 'फुलवंती' हा सिनेमा रिलीज झाला होता आणि हा सिनेमा आता अमेझॉन प्राईम व्हिडिओवर सुरू आहे. या चित्रपटाला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्राजक्ता सध्या बंगळुरू शहरामध्ये आर्ट ऑफ लीव्हिंगच्या कोर्ससाठी दाखल झाली आहे. तिनं या दरम्यान एक व्हिडिओ शूट करुन चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे.
तिला बंगळुरूतील श्री श्री रविशंकर यांचा आश्रम इतका आवडला आहे की जर कलाकार नसते तर इथं आश्रमवासी झाले असते, असं तिनं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. "महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर ह्या घडीला मी बंगलोर आश्रमात आश्रमवासी असते. होय होय…इथे राहणं, ध्यान करणं इतकं आवडतं. आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन., " असं तिनं लिहिलंय. या व्हिडिओत ती आर्ट ऑफ लीव्हिंग विषयी आपल्या चाहत्यांना सांगताना दिसत आहे.
प्रजाक्तानं नवीन अपडेटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. यात ती श्री श्री रविशंकर यांच्यासह दिसत आहे. "पुन्हा एकदा गुरुदेव यांची समक्ष भेट झाली, महत्त्वाचं संभाषण झालं. भानू नरसिंम्हण यांचीही यानिमित्तानं भेट झाली. आर्ट ऑफ लीव्हिंगचा एक अॅडव्हान्स कोर्स करत आहे." हा आपला 15 वा कोर्स असल्याचंही तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
खरंतर प्रजाक्त माळीचं 'फुलवंती' या चित्रपटातनं सिनेनिमिर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण झालं होतं. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहेत तर दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटात प्राजक्तानं फुलवंतीची मध्यवर्ती भूमिका केली होती. या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेचं आणि अभिनयाचं प्रेक्षकांकडून जोरदार स्वागतही झालं होतं.