मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांची निर्मित केली जाते. आता अलीकडच्या काळात मराठी चित्रपट चांगलेच गाजत आहेत. व्यावसायिकदृष्ट्या अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 1988मध्ये रिलीज झालेला 'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट 1 कोटी रुपयांचा आकडा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. यानंतर 1991मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेला 'माहेरची साडी' हा 12 कोटींचा आकडा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट होता. खूप कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटांनी त्या काळामध्ये भरपूर कमाई केली होती. आता नवीन युगाची सुरुवात झाली आहे, मराठी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट तयार निर्मित केले गेले आहेत, की ज्यांनी 50 कोटींचा टप्पा सहज ओलांडला. एका मराठी चित्रपटानं तर चक्क 100 कोटीचा टप्पा पार केला आहे. आज आम्ही तुम्हाला 5 अशा मराठी चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी रुपेरी पडद्यावर धमाकेदार कमाई केली.
- सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
1 सैराट : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 110 कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2016मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं एकूण बजेट 4 कोटीचं होतं. या चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे, निखिल साने, नितीन केणी हे होते. 'सैराट' चित्रपटात रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गलगुंडे, सूरज पवार आणि अरबाज शेख हे कलाकार आहेत.
2 बाईपण भारी देवा : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचं एकूण बजेट 5 कोटीचं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 92 कोटीची कमाई केली. हा चित्रपट 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले यांनी केली होती. या चित्रपटामध्ये सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, दीपा परब आणि सुकन्या कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
3 पावनखिंड : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, भाऊसाहेब आरेकर आणि अनिरुद्ध आरेकर यांनी केली आहे. हा चित्रपट खूप कमी बजेट निर्मित करण्यात आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 75 कोटीची कमाई केली होती. 'पावनखिंड' चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन आणि प्राजक्ता माळी हे स्टार्स दिसले होते.
4 वेड : रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' हा चित्रपट देखील खूप गाजला होता. हा चित्रपट 2022 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माते रितेश देशमुख, जेनेलिया, प्रशांत विलंकर हे आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 75 कोटीची कमाई केली होती. 'वेड' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रितेश देशमुख ,सिद्धार्थ जाधव, विनीत शर्मा आणि अशोक सराफ मुख्य भूमिकेत दिसले आहेत. 'वेड' चित्रपटात सलमान खाननं कॅमियो केला होता.
5 नटसम्राट : महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' हा चित्रपट 2016 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माते नाना पाटेकर, विश्वास जोशी हे आहेत. 'नटसम्राट' चित्रपटाची कहाणी महेश मांजरेकर, किरण यज्ञोपवीत आणि अभिजीत देशपांडे यांनी लिहिली आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे आणि नेहा पेंडसे हे कलाकार आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 48–50 कोटींची कमाई केली होती.