कोल्हापूर : राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी आज कोल्हापुरात एकत्र येत राज्यव्यापी बैठक घेतली. तर शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी, येत्या 12 मार्चला मुंबईला धडक देणार असल्याचा निर्धार त्यांनी केलाय. एक मार्चपर्यंत बाधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा ठाम निश्चय यावेळी करण्यात आला. तर कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या राज्यव्यापी बैठकीत 12 जिल्ह्यातील बाधित शेतकरी उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध : राज्यातील फडणवीस सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला वर्धा ते गोवा शक्तिपीठांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग 86 हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. मात्र, महामार्ग जाहीर झाल्यापासून या रस्त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. नागपूर ते रत्नागिरी असा एक महामार्ग असताना, या शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? असा सवाल उपस्थित करत राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी एकमुखाने या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केलाय. आपल्या जमिनीचा एक तुकडाही या महामार्गासाठी देणार नाही असा निश्चय शेतकऱ्यांनी केलाय. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
सरकारकडून खडा टाकून बघण्याचा प्रयत्न सुरू : या बैठकीनंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कंत्राटदार धार्जिना शक्तिपीठ महामार्ग कुणाच्या फायद्यासाठी रेटला जात आहे? असा सवाल करत शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शक्तिपीठच्या निमित्तानं सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री महामार्ग होणार नाही म्हणतात मात्र, शहरातील आमदार व्हावा म्हणून पाठिंबा देतात. सरकारकडून खडा टाकून बघण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रस्त्यामुळं शेतकऱ्यांचं आयुष्य बरबाद होणार आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी केलेला हा रस्ता आहे. सरकारच्या पैशाचं गणित काय समजत नाही, देशात सिमेंट फॅक्टरी केवळ 5 लोकांची आहे. कोणाचा तरी माल खपवायचा आहे म्हणून हे सर्व सुरू आहे. मग शेतकरी देशोधडीला लागला तरी त्यांना चालेल अशी सरकारची भूमिका आहे का? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी यावेळी उपस्थित केलाय.
मुख्यमंत्री फडणवीस सरड्यासारखे रंग बदलतात: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शक्तिपीठ महामार्ग होणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शक्तिपीठ महामार्गाच्या बाजूने आहेत अशी त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस सरड्यासारखे रंग बदलतात, असा आरोप धाराशिव जिल्ह्यातून आलेले शेतकरी संभाजी फडतारे यांनी केला.
हेही वाचा -