मुंबई - बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट अपयशी ठरत असताना 'भूल भुलैया ३'ला मिळालेले यश बॉलिवूडकरांना सुखावणारं आहे. त्यातही 'भूल भुलैया ३' चे कलाकार कार्तिक आर्यन, त्रिप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांना जास्त आनंददायी असणार यात शंका नाही. 'भूल भुलैया ३' नं बॉक्स ऑफिसवर नेत्रदीपक यश प्राप्त केलं असून तो सुपरहिट ठरवला गेला आहे. नुकतीच 'भूल भुलैया ३' च्या निर्मात्यांनी सक्सेस पार्टी आयोजित केली होती ज्याला चित्रपटातील सर्व स्टारमंडळी उपस्थित होती. 'भूल भुलैया'ची ओरिजिनल 'मंजूलिका', विद्या बालनने देखील आवर्जून हजेरी लावली होती. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांना विद्याबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यातील काही अंश.....
'भूल भुलैया ३' ला अभूतपूर्व यश लाभलं आहे आणि त्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. कसं वाटतंय?
एकदम भारी वाटतंय. जेव्हा 'भूल भुलैया ३' चं कथानक ऐकलं तेव्हा मला जाणीव होती की हा चित्रपट चांगला धंदा करेल. परंतु इतकं उत्तुंग यश मिळंल याची यत्किंचितही कल्पना नव्हती. जेव्हा मी 'भूल भुलैया ३' करतेय हे आजूबाजूच्या लोकांना कळले तेव्हा सर्वजण, तो कधी येणार याची विचारणा करीत होते. थोडक्यात या चित्रपटाबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. 'भूल भुलैय्या फ्रँचायझी' मध्ये मी परतल्यामुळे त्यांना आनंद झाला होता. परंतु त्यामुळे माझ्यावर दडपण आल होत. शक्यतो मी प्रेशर घेत नाही, परंतु लोकांच्या उंचावलेल्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कंबर कसण गरजेच होत. 'भूल भुलैया ३' ला मिळालेल्या उत्तुंग यशामुळे मी अत्यंत आनंदी आहे. खरंतर, 'भूल भुलैया' हा चित्रपट, त्यातील भूमिका व 'आमी जे तोमार' हे गाणे यांनी मला आयुष्यात खूप काही मिळवून दिल आहे. आजही १७ वर्षांनंतर लोकांना त्याची आठवण आहे हे सुखावह आहे आणि मी त्यांच्या अपेक्षेवर खरी उतरल्याचा आनंद अतीव आहे. मी माझे चाहते आणि देवाची ऋणी आहे.
तू आशयघन चित्रपटांत रमतेस परंतु बॉक्स ऑफिस सक्सेस बाबतीत तुझे काय म्हणणे आहे?
चित्रपट छोटा असो वा मोठा, बॉक्स ऑफिस सक्सेस अत्यंत महत्वाचं आहे. सिनेमा हा बिझनेस आहे. कोणी ५ रुपये लावले तर त्याचे कमीतकमी ६ रुपये व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. सिनेमा बिझनेसमध्ये नफा तोटा महत्वाचा ठरतो. सध्या हिंदी चित्रपट अथवा इतर भाषिक चित्रपट फारसे चालताना दिसत नाहीयेत. चित्रपटांनी कमाई केली नाही तर निर्माते पुढचे चित्रपट कसे बनवतील? त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या सक्सेसला जास्त महत्व आहे. चित्रपट चालला तर त्या यशाची चव जास्त गोड लागते आणि 'भूल भुलैया ३' सुपररहिट झाल्यामुळे सध्या माझ्या जिभेवर ती चव आहे (हसते).
'भूल भुलैया ३' मध्ये माधुरी दीक्षित सुद्धा आहे हे तुला माहित होतं का?
नाही. मला ठाऊक नव्हतं. माझे कास्टिंग सुरुवातीला झालं होतं. नंतर कळले की दिग्दर्शक अनिस बाझमीची माधुरीबरोबर भेट झाली होती तेव्हा त्यानं बिचकतच तिला या चित्रपटाची ऑफर दिली होती. सुदैवाने माधुरी तयार झाली. मला शंका होती की आता प्रॉडक्शनवाले मला माधुरी सोबत नृत्य करायला लावणार आणि ती खरी ठरली. 'आमी जे तोमार' हे गाणे माझे असले तरी माधुरीबरोबर नृत्य करायचं हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. सर्वांनाच माहितीये की माधुरी उत्तम नृत्यांगना आहे त्यामुळे माझी माफक इच्छा होती की 'इज्जत बचनी चाहिये'. खरोखर त्यामुळे नृत्यासाठी मी कठोर मेहनत केली आहे. त्यासुमारास मी 'दो और दो प्यार' चे प्रोमोशन करीत होते. तेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नृत्यसराव करीत होते. प्रोमोशन करताना दमछाक होते परंतु मी रात्रीसुद्धा, कधीकधी २ डार्क चॉकलेट्स खाऊन, प्रॅक्टिस करीत असे. अर्थात माधुरी ही माधुरी आहे, तिच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. परंतु मला वाटते की मी त्या नृत्याला न्याय दिलाय आणि बऱ्यापैकी छान डान्स केला आहे.
माधुरी तुझी आयडॉल होती/आहे. तिच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
माधुरी खूप गोड आहे. बऱ्याचदा असं असतं की काही लोक आपल्याला दुरून चांगले वाटतात परंतु प्रत्यक्ष भेटीत वेगळा अनुभव येऊ शकतो. परंतु माधुरीला भेटल्यावर मला ती अधिक आवडू लागली. आधी प्रेम वाटत तर होतेच परंतु आता तिच्याबाबतीत रिस्पेक्टदेखील वाढला आहे. आजही ती आपल्या कामाबाबत खूप कष्ट घेते. त्याचबरोबर ती नेहमी मदतीसाठी तयार असते. गाण्याच्या शूटवेळी अचानक डान्सिंग स्टेप्स बदलल्यामुळे मला त्या कठीण वाटत होत्या. मी सांगून टाकलं की मला त्या जमत नाहीयेत. त्यावेळी माधुरी माझ्या मदतीस धावून आली. ती म्हणाली, 'अगं, काही कठीण नहिये. जमतील त्या स्टेप्स तुला.' आणि तिनं त्या स्टेप्सची फोड करीत मला समजावून सांगितल्या आणि खरं सांगते की क्लिष्ट वाटणाऱ्या त्या स्टेप्स मला सोप्या वाटू लागल्या. ही माधुरीची कमाल होती.
तुझ्या जास्त वजनाबद्दल नेहमी चर्चा असायची, आता तू कमी केलेल्या वजनाबद्दल चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगशील?
खरंतर मी नेहमीच अनुशासित जीवनशैली जगत आले आहे परंतु माझे वजन कमी न होता सारखे वाढत राहायचे. बरेच डॉक्टर्स झाले, अगणित आहारतज्ज्ञ झाले परंतु माझे वजन काही कमी होत नव्हतं. नंतर मी त्याबद्दल विचार करणं सोडून दिलं. मी माझ्या बॉडी टाईप बाबत खूष राहून जगायला शिकले होते. मध्यंतरी माझे पती सिद्धार्थ (रॉय कपूर) यांनी मला केरळ मधील एका हेल्थ सेंटर ला कन्सल्ट करण्याचा सल्ला दिला. मला अजिबात विश्वास नव्हता की माझे वजन कोणी कमी करू शकेल परंतु त्यांना विश्वास होता. त्यांनी दिलेल्या दिशेने माझ्यात आमूलाग्र बदल घडत गेला आणि माझे न घटणारे वजनही कमी होऊ लागले. मी नक्कीच आनंदी आहे कारण शरीरातील जडपणा लुप्त झालाय आणि कोणत्याही प्रकारच्या वेदनाही नाहीत. त्याचबरोबर आता मी मला हवे तसे कपडे परिधान करू शकते याचाही आनंद आहे.
'मंजूलिका २.०' बद्दल काय सांगशील?
'भूल भुलैया' आणि 'भूल भुलैया ३' मधील भूमिका भिन्न आहेत. पहिल्यात अवनी होती आणि तिसऱ्यात मल्लिका आहे. मल्लिकाच्या भूमिकेत थोडा गूढपणा आहे. प्रेक्षकांना माहित होतं की मी मंजूलिका साकारलेली आहे त्यामुळे शेवटाला येणाऱ्या ट्विस्टला अधिक मजा येते. मी हा चित्रपट करताना पहिला 'भूल भुलैया' पाहिला नाही कारण मी यातील भूमिकेला नव्याने सामोरी गेले. हा चित्रपट, त्यातील भूमिका मी नवीन प्रोजेक्ट प्रमाणे हाताळले. परंतु एक मला प्रामुख्याने जाणवलं ते हे की मी ही भूमिका साकारताना मंजूलिका मला गाईड करीत होती असे जाणवलं. आणि मी नक्कीच म्हणेन की, मंजूलिकाचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत.