मुंबई - भारताला सर्वात पहिल्यांदा कुस्तीमध्ये कास्य पदक मिळवून देणारे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावर नागराज मंजुळे चित्रपट बनवत आहेत. गेल्या काही महिन्यापासून याचं शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोही अधून मधून सोशल मीडियावर पाहायला मिळतात. नागराज मंजुळे हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रतिभावान दिग्दर्शक असून त्यांच्या नावाचा मराठी सिनेसृष्टीत मोठा दबदबा तयार झाला आहे. मात्र त्यांच्या या खाशाबा चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आता एक अडथळा निर्माण झाला आहे.
नागराज मंजुळे बनवत असलेल्या खाशाबा चित्रपटाच्या कथेच्या हक्कावरुन वाद निर्माण झाला असून हे प्रकरण आता न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. यासाठी नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात क्रिडा लेखक संजय दुधाणे यांच्या वतीनं दावा दाखल झाला आहे. यानंतर न्यायालयानं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स पाठवल्याचं समजत आहे.
संजय दुधाणे हे नामवंत क्रिडा पत्रकार असून त्यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील एक चरित्र लिहिलं होतं. आजवर 15 आवृत्या निघालेल्या या पुस्तकाचं प्रकाशन 2001 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झालं होतं. याच पुस्तकाचा आधार घेऊन खाशाबा चित्रपटाची पटकथा तयार करण्यात आल्याचा दावा संजय दुधाणे यांनी न्यायालयात केला आहे. याबाबत नागराज मंजुळे यांच्याकडून अथवा जिओ स्टुडिओच्या वतीनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाच्या संबंधात खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजीत जाधव यांच्याशी संपर्क साधला होता. रणजीत यांनीच या चित्रपटाची कथा संजय दुधाणे यांनी लिहिलेल्या खाशाबांच्या चरित्रावर आधारित असल्याचं जाहीर केलं होतं. तरीही गेल्या दोन वर्षापासून संजय दुधाणे आणि चित्रपटाची टीम यांच्यात अनेक चर्चा होऊनही हा वाद मिटला नसल्याचं समजतंय. हा चित्रपट बनावा ही तमाम क्रिडा रसिकांची आणि कुस्तीप्रेमी जनतेची मागणी आहे. नागराज मंजुळे या कथेला न्याय देतील हा विश्वासही प्रेक्षकांना आहे. मात्र अशा प्रकारे अडथळे निर्माण झाल्यामुळे हा चित्रपट कधी रिलीज होणार याची चिंता वाटत आहे.