मुंबई: 'स्त्री 2' चित्रपटानं 2024मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता श्रद्धा कपूर पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटासाठी सज्ज आहे, ती 'नागिन' बनणार आहे. 'नागिन' चित्रपटाची पटकथा लिहिण्यासाठी 3 वर्षे लागले असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर खूप सुरू आहे. 'नागिन' चित्रपटाचे निर्माते निखिल द्विवेदी यांनी एक अपडेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानुसार चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
श्रद्धा कपूर साकारणार नागिनची भूमिका : निर्माते निखिल द्विवेदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पटकथेचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लिहिलं गेलं आहे, 'नागिन, प्रेम आणि त्यागाची एक महाकाव्य कथा.' याशिवाय याचं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे, 'मकर संक्रांती अॅन्ड फायनली...' हा चित्रपट लवकरच फ्लोरवर जाण्यासाठी सज्ज आहे. गेल्या वर्षीच निखिलनं खुलासा केला होता की, श्रद्धा कपूर 'नागिन' चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यास उत्सुक आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय श्रद्धानं एक्सवर 'नागिन'बद्दलही सांगितलं होतं. तिनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'मोठ्या पडद्यावर नागाची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मला श्रीदेवी मॅम या 'नागिना'मध्ये खूप आवडल्या आणि मला नेहमीच अशीच कहाणी करायची होती.'