दुबई ( यूएई ) - सुपरस्टार शाहरुख खान बुधवारी दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट (WGS) मध्ये सहभागी झाला होता. यावेळी झालेल्या पत्रकार रिचर्ड क्वेस्ट यांच्याशी संवादात्मक सत्रात त्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या अनेक दशकांच्या प्रवासाबद्दल खुलासा केला. हॉलिवूडच्या चित्रपटांबद्दलही त्यानं आपली मतं सांगितली.
त्यानं अद्यापही पाश्चिमात्य फिल्म इंडस्ट्रीकडे पाऊल का टाकले नाही? असा प्रश्न विचारले असता शाहरुख म्हणाला, ''मी हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, परंतु कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. याबाबत कोणीही मला ऑफर दिलेली नाही. मी तिथल्या लोकांशी संवाद साधलाय. मला माहिती आहे की पाश्चिमात्य देशात, अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये, इंग्लिश फिल्म इंडस्ट्रीत खूप चांगले लोक आहेत, पण कोणीही मला कामाची ऑफर दिलेली नाही. कलाकारांनी सीमा ओलांडल्या पाहिजे हे मी ऐकलंय, परंतु तरीही मला ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला शिकायचे आहे. त्यामुळे, मला हॉलीवूड किंवा इंग्लंडमध्ये कधीही चित्रपटाची ऑफर आलेली नाही."
मात्र, शाहरुखने कबूल केलं की, डॅनी बॉयलच्या 'स्लमडॉग मिलेनियर' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात त्याला भूमिकेची ऑफर आली होती, परंतु त्यानं ती नाकारली होती. "होय,माझ्याकडे स्लमडॉग आला होता, आणि मी मिस्टर बॉयलसोबत खूप वेळ घालवला. तो खूप छान आहे. पण मी टेलिव्हिजनवर 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर' करत होतो, पण मला असे वाटले की चित्रपटातील कथेत जी व्यक्ती आहे त्याचं होस्टिंग खूप वाईट होतं. शो प्रोड्यूस करणाऱ्या लोकांना मी चित्रपट करावा अशी इच्छा होती. पण कथेचं पात्र फसवणूक करतं आणि एक होस्ट म्हणून अप्रमाणिक राहतं, हे मला खूप विचित्र वाटलं आणि मी मिस्टर बॉयलला समजावून सांगितले की मला हे आवडणार नाही, आणि माझ्यापेक्षा बरेच चांगले अभिनेते आहेत. अनिल कपूर यांनी ते केले, आणि तो होस्ट म्हणून त्यांनी विलक्षण काम केलं," असं शाहरुख म्हणाला.