मुंबई- Amrita Singh birthday : 90 च्या दशकातील यशस्वी अभिनेत्री अमृता सिंगचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिची मुलगी सारा अली खानने आईसाठी एक सुंदर आणि हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. साराने तिच्या आईबद्दल असलेली तिची नितांत ओढ पोस्टमधून व्यक्त केली आहे. तिने आईला आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ मानलं आहे. तिच्याबद्दल असलेला अभिमानही व्यक्त केलाय.
इन्स्टाग्रामवर साराने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्या आईसोबतचे दोन फोटो शेअर केले. पहिल्या फोटोत साराच्या आगामी चित्रपट 'मर्डर मुबारक'च्या सेटवर आई-मुलीची छान जोडी दिसत आहे. यामध्ये सारा अली खान आईच्या गळ्यात हात घालून उभी असून तिच्या हातात 'मर्डर मुबारक'चा क्लॅपबोर्ड दिसत आहे. दुसऱ्या फोटोत दोघीही 'ए वतन मेरे वतन' या देशभक्तिपर चित्रपटाच्या सेटवर अभ्या असून यात साराने सुंदर साडी नेसली आहे.
हिंदी आणि इंग्रजी मिश्रित भाषेत लिहिलेल्या तिच्या वाढदिवसाच्या संदेशात, सारा अलीने कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त केली आणि तिच्या आयुष्यात तिच्या आईचे खूप महत्त्व आहे हे मान्य केले. साराने तिला झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल माफी मागितली आणि तिच्या आईचा सन्मान आणि वारसा जपण्याची इच्छा व्यक्त केली. साराने अमृताचे अनंत प्रेम, संयम आणि मार्गदर्शनासाठी आभार मानले. आईनेच तिला सुरक्षिततेची भावना आणि मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता दिली आहे. आई हेच तिच्यासाठी संपूर्ण जग आहे, असे मत व्यक्त करून तिने शुभेच्छा संदेशाचा समारोप केला.