मुंबई - Laapataa ladies : अभिनेता आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमधून किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगली प्रशंसा मिळत आहे. या चित्रपटाचे अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं असून किरणची अनोख्या कल्पना असलेला हा चित्रपट पाहून अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. अलीकडेच, बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननेही 'लापता लेडीज'बद्दल एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ''आत्ताच किरण रावचा 'लापता लेडीज' हा पाहिला. व्वा, किरण मला आणि माझ्या वडिलांना हा चित्रपट पाहून खूप छान वाटला. दिग्दर्शक म्हणून पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन, उत्तम काम. तू माझ्याबरोबर कधी काम करणार आहेस, किरण?'' असा किरणला सलमाननं प्रश्नही केला आहे.
'लापता लेडीज' चित्रपटाची स्टार कास्ट :किरण रावच्या 'लापता लेडीज' या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन, छाया कदम, दुर्गेश कुमार, सतेंद्र सोनी आणि हेमंत सोनी यांच्याही विशेष भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. 'लापता लेडीज' चित्रपटाची कहाणी ग्रामीण विभागामधील असून एका तरुणच्या हरवलेल्या नववधूच्या शोध घेण्याभोवती फिरणारी कथा आहे. ही नववधू रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या पतीपासून विभक्त होते. पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करणारा रवी किशन जेव्हा या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी घेतो, तेव्हा या कहाणीला वेगळे वळण मिळते.