मुंबई - Saif Ali Khan : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. सैफ रुग्णालयात दाखल असल्याची बातमी समोर येत आहे. रुग्णालयात त्याच्या साथीला त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफ अली खानचा गुडघा आणि खांदा फ्रॅक्चर झाला होता. याच कारणामुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. सैफच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. ही शस्त्रक्रिया फारशी गंभीर नाही. आता सैफची तब्येत ठीक आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफनं माहिती दिली की, ''शस्त्रक्रिया चांगली झाली आहे. आता मी बरा आणि आनंदी आहे. सर्व चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद.'' दरम्यान त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सैफवर याआधी शस्त्रक्रिया झाली :सैफ बऱ्याच दिवसांपासून शस्त्रक्रिया पुढं ढकलत होता. सैफ अली खानची जखमी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो शूटिंग सेटवर अनेकदा जखमी झाला होता. 2016 मध्ये 'रंगून' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफच्या अंगठ्यालाही दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, मात्र ती शस्त्रक्रिया फारशी गंभीर नव्हती. सैफबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या 53 व्या वर्षी तो चित्रपट क्षेत्रात सक्रिय आहे. तो आतापर्यंत शेवटचा 2023 मध्ये आलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटात दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटामध्ये त्यानं रावणाची व्यक्तिरेखा साकारली होती.