छत्रपती संभाजीनगर : "आगामी काळात देशभरातील जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं निदान पहिल्याच टप्प्यात झालं तर, उपचार करणं सोपं होईल. त्यावर नवीन लस तयार होत आहे. ज्यामुळं महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात असून, आगामी सहा महिन्यात ती बाजारात येईल. 8 ते 16 वयोगटात ती घेतली तर, कॅन्सर सारख्या आजाराला थांबवण्यात यश मिळेल. याशिवाय त्यावरील औषधं देशात निर्माण करण्याचं काम सुरू आहे. बजेटमध्ये यासाठी भरपूर तरतूद करण्यात आली आहे. यासह विविध योजनांसाठीही बजेट अतिशय समर्पक झालय." अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णात वाढ : "भारतात ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये भारतात 2 लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यात महाराष्ट्रातील महिलांची संख्या 17,736 होती. तर, 2023 मध्ये देशात 2.21 लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. यात महाराष्ट्रातील महिलांची संख्या 19,530 होती. इंडियन कॅन्सर सोसायटीनुसार, चालू दशकाअखेर भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दरवर्षी 50 हजारांची वाढ होऊ शकते. त्यामुळं ही लस फायदेशीर राहील." असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.
औषधांचे सीमा शुल्क कमी होणार : "केंद्र सरकारनं 36 औषधांवरील सीमा शुल्क कमी केलं आहे. यासह 13 नवीन योजना सुरू केल्या जात आहेत. आयुष मंत्रालयाची स्थापना 2014 साली झाली होती. याआधी योग साधना ही विद्या कोणाला माहीत नव्हती. मात्र, आता 170 देशात योग दिवस साजरा केला जातो. आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी वैद्यकीय केंद्रात सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आयुष ग्रामच्या माध्यमातून नवीन केंद्रांची सुरुवात केली जाणार आहे. लवकरच आयुर्वेदाचे रुग्णालय होणार आहे. तर, आयुर्वेदाच्या दोन महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. वेलनेस सेंटरच्या माध्यमातून पर्यटन वाढवण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी एक वर्षाचा व्हिसा दिला जात आहे. मागील वर्षी 40 हजार लोक परदेशातून देशात आले होते. प्राचीन उपचार पद्धती वाढवण्यासाठी 'देश का प्रकृती प्रशिक्षण' योजनेची घोषणा केली आहे." अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली.
नवीन तंत्रज्ञान आणणार : "एमएसएमईमध्ये अनेक बदल केले जात आहेत. लहान उद्योगांना पाच लाखांचं क्रेडिट कार्ड होतं, ते आता दहा लाख केलं आहे. नवीन उद्योगांना स्टार्टअपसाठी विस्तारित निधी देत असून, त्यासाठी दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. प्रत्येक शाळेत अटल लॅब सुरू करणार आहोत. तांत्रिक ज्ञान वाढवण्यासाठी पहिल्या वर्षी 50 हजार शाळांमधे लॅब सुरू करण्यात येणार आहे. ए. आय.चं प्रशिक्षण शाळांमधे सुरू करणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीनं करण्यासाठी मुलांना शिकवण दिली जाणार आहे." अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
प्रवास जलद करणार : "लहान विमानतळाच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहे. जवळपास 120 विमानतळांवर सुविधा आणि वाहतूक सुरू केल्यामुळं प्रवास जलद होणार आहे. मोठ्या शहरात वाहतूक कोंडी होते. त्यामुळं त्या शहरांमध्ये मेट्रो सुरू करणार आहे. राज्यातील काही रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण करण्याचं काम सुरू आहे." अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
हेही वाचा :