सातारा : कराडचे डीएवायसपी अमोल ठाकूर यांच्या पथकासह गुन्हे प्रकटीकरण शाखेनं ओगलेवाडी रेल्वे स्टेशन परिसरात ताब्यात घेतलेल्या तिघांकडं एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज आढळून आलं होतं. या ड्रग्ज तस्करी प्रकरणी आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांसह १२ जणांना अटक करण्यात आलीय. तसंच १ लाख १४ हजार रुपये किमतीचं ३७ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती डीएवायएसपी अमोल ठाकूर यांनी दिली.
गोपनीय माहिती काढून कारवाई : ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी डीएवायएसपी अमोल ठाकूर यांनी स्वतंत्र पथक तयार केलं होतं. या पथकानं महिनाभर गोपनीय माहिती गोळा केली. कराड रेल्वे स्टेशन-टेंभू रस्त्यावर ड्रग्ज विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडं ६० हजार रुपये किंमतीचं एमडी ड्रग्ज आढळून आलं होतं.
मुंबईतून दोन परदेशी नागरिकांना अटक : कराडमधील ड्रग्ज नेटवर्कची लिंक मोठी असल्याचं तपासात स्पष्ट झाल्यानंतर मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह अन्य ठिकाणी पोलिसांची चार पथकं तपासासाठी रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी मुंबईतून दोन परदेशी नागरिकांना अटक केली. त्यांच्याकडूनही ड्रग्ज जप्त करण्यात आलं.
आतापर्यंत बारा संशयितांना अटक : राहूल अरुण बडे, समिर उर्फ सॅम जावेद शेख, तौसिब चाँदसो बारगिर, संतोष अशोक दोडमणी, फैज दिलावर मोमीन, अमित अशोक घरत, दीपक सुभाष सूर्यवंशी, बेंझामिन ॲना कोरु (आफ्रिका), रोहित प्रफुल्ल शहा, सागना इमॅन्युअल (सेनेगल देश), नयन दिलीप मागाडे आणि प्रसाद सुनिल देवरुखकर अशी ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
मुंबईतील ड्रग्जचं कोरेगाव कनेक्शनही समोर : एनसीबीनं (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) मुंबईत जप्त केलेल्या ड्रग्ज प्रकरणाचं सातारा कनेक्शनही मागील आठवड्यात समोर आलं. एनसीबीच्या मुंबई युनिटनं कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावात छापा मारून २०० कोटींचं २२ किलो ड्रग्ज जप्त करून चौघांना अटक केली. या कारवाईनंतर कोरेगावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर कराडमध्येही ड्रग्ज तस्करी उघडकीस आली.
हेही वाचा -
- विटा येथे एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, तिघांना अटक करत ड्रग्जसह पावणेतीस कोटींचा मुद्देमाल जप्त
- नवीन वर्षाच्या पार्टीला राजस्थानमधून आणलेलं ड्रग्ज पोलिसांनी पकडलं, पाच तस्करांना ठोकल्या बेड्या
- मुंबई पोलिसांची जोधपूरमध्ये ड्रग्ज कारखान्यावर धाड, 100 कोटींहून अधिक किमतीचं ड्रग्ज जप्त - Drugs Factory Busts In Jodhpur