मुंबई - Ranveer Singh : साऊथ चित्रपटसृष्टीतील सुपरहिट दिग्दर्शक एस. शंकर यांनी अलीकडेच आपली मुलगी ऐश्वर्या शंकरचा विवाह तरुण कार्तिकेयनशी केला. या लग्नात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार रजनीकांत, कमल हसल, दिग्दर्शक मणिरत्नम, चियान विक्रम, सूर्या आणि नयनतारा यांनी हजेरी लावली होती. आता या लग्नामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग हा 'जवान' दिग्दर्शक ॲटलीबरोबर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रणवीर सिंग काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत असून तो ॲटलीबरोबर काही सुंदर स्टेप करत आहे.
रणवीर सिंगचा डान्स : थलपथी विजयच्या 'आपडी पोडे' या गाण्यावर रणवीर सिंग आणि दिग्दर्शक ॲटलीनं भन्नाट डान्स केला असून त्यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं. याशिवाय रणवीर आणि ॲटली यांनी विजयच्या 'मास्टर' चित्रपटातील 'वाथी कमिंग' या गाण्यावरही जोरदार डान्स करून सर्वांची मनं जिंकली. तसेच या लग्नात शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस'मधील 'लुंगी डान्स' या गाण्यावर अनेकांनी डान्स केला. यावेळी रणवीरनं 'रामलीला' या चित्रपटातील हिट गाण्यावर सुंदर डान्स केला. दरम्यान ऐश्वर्या शंकरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिचे हे दुसरे लग्न आहे. ऐश्वर्यानं पहिलं लग्न क्रिकेटर दामोदरन रोहितबरोबर केलं होत.