मुंबई - अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या भूमिका असलेला 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या फ्रँचायझीचे अपडेट रिलीज होण्याच्या २ दिवस अगोदर उघड झाले आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत अनेक कयास बांधले जात होते. आता बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. अधिकृत शीर्षकापासून ते 'पुष्पा 3' च्या अभिनेत्यापर्यंत बऱ्याच गोष्टींवरचा पडदा उचलण्यात आला आहे.
आज 3 डिसेंबर रोजी फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालनने काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये 'पुष्पा 3' बद्दलचे अपडेट देण्यात आलं आहे. मनोबालाने पोस्ट केलेल्या लेटेस्ट अपडेटमध्ये 'पुष्पा 3' ची पुष्टी केली आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोत साऊंड डिझायनर रेसुल पुकुट्टी आणि उर्वरित क्रू चित्रपटाच्या तिसऱ्या फ्रेंचायझीच्या टायटल स्क्रीनसमोर उभा असलेला दिसत आहे.
'पुष्पा'च्या तिसऱ्या फ्रँचायझीचं नाव
व्हायरल झालेल्या फोटोमुसार 'पुष्पा'च्या तिसऱ्या फ्रँचायझीचे अधिकृत नाव 'पुष्पा 3: द रॅम्पेज' असणार आहे. 'पुष्पा 3' बद्दलची ही बातमी समजताच सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. द रॅम्पेज काय आणू शकते हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.
'पुष्पा 3'मध्ये विजय देवरकोंडाची एन्ट्री!
या नव्या चित्रपटाशी संबंधीत इंटरेस्टिंग अशी आणखी एक गोष्ट म्हणजे 2022 मध्ये साऊथ स्टार विजय देवरकोंडा यानं दिग्दर्शक सुकुमारच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा 3' बद्दलची एक पोस्ट केली होती. यामुळे, अल्लू अर्जुन-रश्मिका मंदान्ना स्टाररच्या तिसऱ्या फ्रँचायझीमध्ये विजय देवराकोंडा भूमिका साकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबातमीला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 'पुष्पा : द राइज' या पहिल्या चित्रपटाच्या अखेरीस फहाद फसिल याची दमदार एन्ट्री झाली होती. यामध्ये अल्लु अर्जुनच्या आक्रमकपणाला फहाद फसिल आव्हान देताना दिसला होता. आता दुसऱ्या भागात दौघांची मोठी जुगलबंदी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याप्रमाणेच 'पुष्पा : द रुल'च्या अखेरीस विजय देवराकोंडाची एन्ट्री होणार का हाही प्रेक्षकांच्या दृष्टीनं एक औत्सुक्याचा विषय असू शकतो.
'पुष्पा 3 : द रॅम्पेज' या शीर्षकावरून असा अंदाज बांधला जात आहे की, हा एक जबरदस्त ड्रामा आणि दमदार अॅक्शन असलेला पुष्पा चित्रपटाच्या शेवटचा अध्याय असू शकतो. चाहते आधीपासूनच एका भव्य सिनेमाचं स्वप्न पाहात आहेत आणि त्याला साजेसंचं काही भव्य करण्याची निर्मात्यांची योजना असू शकते.
सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग 'पुष्पा 3 : द रॅम्पेज ( #Pushpa3TheRampage ) ट्रेंड सुरू आहे. यामुळे लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्या, पुष्पा 2 हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे आणि तिसऱ्या भागाच्या पुष्टीमुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.