मुंबई - साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. यासाठी गेल्या दोन तीन दिवसापासून लोकांनी 'पुष्पा 2' च्या अॅडव्हान्स बुकिंगची तिकीटं खरेदी केली आहेत. पण सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटासाठी तिकीट दरात वाढ झाल्यामुळे निर्मात्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला आहे.
फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालन यांनी सोमवारी संध्याकाळी एक पोस्ट शेअर केली. मनोबाला विजयबालन यांच्या म्हणण्यानुसार, 'पुष्पा 2' तिकिटांच्या किमतीत वाढ केल्याच्या विरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी आदेशानंतर 'पुष्पा 2' च्या तिकीट दरात वाढ केल्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी मंगळवारी ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी, तेलंगणा सरकारनं 'पुष्पा 2' साठी अधिकृत आदेश जारी केला होता. यानुसार 'पुष्पा 2' च्या तिकिटाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारने सर्व प्रीमियर शोसाठी तिकिटांच्या दरात 800 रुपयांनी वाढ करण्याची परवानगी दिली असून 5 ते 8 डिसेंबरपर्यंत तिकिटांच्या दरात 200 रुपयांनी वाढ होऊ शकते.
तेलंगणा सरकारनं जारी केला आदेश
तेलंगणा सरकारच्या अधिकृत आदेशानुसार, 'पुष्पा 2: द रुल' चा फायदा शो 4 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजता तेलंगणातील सर्व चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाणार आहे. त्यासाठी तिकीट दरात 800 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 5 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजता आणि पहाटे 4 वाजता तेलंगणातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 2 अतिरिक्त शो दाखवले जातील. म्हणजोच एका थिएटरमध्ये रोज 7 शो दाखवले जाणार आहेत. सिंगल स्क्रीनसाठी 5 डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत 150 रुपये, 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर 105 रुपये आणि 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत 20 रुपयांनी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. मल्टिप्लेक्स/आयमॅक्ससाठी 05 डिसेंबर ते 08 डिसेंबर 200 रुपये, 09 डिसेंबर ते 16 डिसेंबर 150 रुपये आणि 17 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत संपूर्ण तेलंगणामध्ये 50 रुपये अशी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे..
काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चे नवीन गाणे 'पीलिंग्स' लाँच केलं होतं. 'किसिक'पेक्षा या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पा राज, रश्मिका मंदान्ना श्रीवल्ली आणि फहद भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलंगणामध्ये मात्र हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी विशेष शोसह थिएटरमध्ये दाखल होणार आहे.