पुणे - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी यांनी दिली.
महात्मा फुले समता पुरस्कार’च स्वरूप हे रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० (साडेदहा) वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला आहे. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२४ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.