महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पूनम पांडेवर कारवाई करण्याची मागणी; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर - पूनम पांडे मृत्यू पोस्ट

Poonam Pandey : अभिनेत्री तथा मॉडेल पूनम पांडेनं मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यामुळं आता अनेकजण तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मृत्यूच्या बातमीनंतर पूनमला सोशल मीडियावर अनेकजण ट्रोल करत आहेत. तसंच सेलिब्रिटींपासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत सर्वचजण यावर प्रतिक्रिया देत आहेत.

poonam pandey
पूनम पांडे

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 11:38 AM IST

मुंबई Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी ऐकून चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. या घटनेचा अनेकांना धक्का बसला होता. 2 फेब्रुवारीला पूनम पांडेच्या टीमनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. गर्भाशयाच्या कर्करोगानं पूनमचं निधन झाल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, 3 फेब्रुवारीला पूनमनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि 'मी जिवंत' असल्याचं सांगितलं. ''हे सर्व कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी केलंय," असं तिनं पोस्टमध्ये नमूद केलं होतं.

पूनमवर कारवाईची मागणी : सोशल मीडियावर पूनम पांडेनं मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यामुळं आता चाहते आणि सेलिब्रिटी हे प्रचंड नाराज झाले आहेत. अनेकजण तिच्यावर टीका करत आहेत. पूनम पांडेवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही आता राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच करत आहेत. खोट्या पोस्टमुळं पूनम सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे.

पूनम पांडे जाऊ शकते तुरुंगात? : मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याबद्दल पूनमला तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच तिला मोठा दंडही भरावा लागू शकतो. आयटी कायदा 2000 च्या कलम 67 नुसार, सोशल मीडियावर मृत्यूची बातमी पसरवल्याबद्दल आणि कोणी दोषी आढळल्यास, या प्रकरणात आरोपीला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत मोठा दंड भरावा लागू शकतो. या गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंडाची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळं पूनमवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

जिवंत असल्याचा केला खुलासा : 3 फेब्रुवारीला पूनमनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'मी जिवंत' असल्याचं सांगितलं. यानंतर तिला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल करू लागले आहेत. आता तिला काहीजण मुर्ख असल्याचं म्हणत आहेत. याशिवाय खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल पूनमवर कठोर कारवाई करण्याची विनंती अनेकांनी मुंबई पोलिसांकडं करत आहेत. 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'नंही तिच्याविरोधात एफआयआरची मागणी केली आहे. 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी म्हटलं, "पूनमनं भारतातील लोकांच्या भावनांशी खेळ केला आहे. तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर अनेकांनी तिच्या आणि तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना केली होती. तिनं सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. एका प्रसिद्धीच्या स्टंटमध्ये तिनं हे सर्व केलंय. कर्करोगाबद्दल जनजागृती करण्याचा हा योग्य मार्ग नव्हता. मी पोलिसांना विनंती करतो की तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदवावी."

सेलिब्रिटींनी केली टीका : पूनम पांडेवर हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीसुद्धा संतापले आहेत. मंदिरा बेदीनं इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, ''या मूर्ख महिलेकडं लक्ष देऊ नये, हा अतिशय वाईट आणि प्रसिद्धीचा स्टंट आहे. तिला बॉयकॉट केलं पाहिजे." आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, "इतकं खाली कोणी कसं जाऊ शकतं? धक्कादायक आणि विश्वास बसत नाही. पब्लिसिटी स्टंटपासून दूर राहा.'' यासह आता अनेकजण पूनम पांडेवर टीका करत आहेत.

राजकारण्यांची कारवाईची मागणी : पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीनंतर राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर चक्क श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, नंतर त्यांना हा सर्व प्रकार समजला होता. त्यामुळं तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केलं होतं. तसंच विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांनीही पूनम पांडेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

  1. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचा 'आशा भोसले' पुरस्कार पार्श्वगायक शान यांना जाहीर
  2. खोट्या मृत्यूच्या बातमीबद्दल पूनम पांडेवर चौफेर टीका, तर राम गोपाल वर्मानं केलं समर्थन
  3. 'शिवरायांचा छावा'मध्ये बहिर्जी नाईकची ऐतिहासिक भूमिका साकारणार रवी काळे

ABOUT THE AUTHOR

...view details