मुंबई - महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासातील मानवत हत्याकांड हे संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारं ठरलं होतं. एका पाठोपाठ खुनाची मालिका सुरू होती. पोलीस हवालदील झाले होते, रहिवाशी घाबरले होते आणि रात्रीच्यावेळी मुलीबाळी घराबाहेर पडायलाही दचकत होत्या. ही घटना आहे नोव्हेंबर 1972 ते जानेवारी 1974 या काळातली. परभणी जिल्ह्यातील मानवत हे छोटंस गाव, पण इथं घडलेल्या मृत्यूच्या थैमानानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. शेतात गुप्त धनाचा हांडा मिळावा आणि संतती प्राप्ती व्हावी यासारख्या कारणासाठी एकाच गावातील 12 जणांचे मुडदे पाडण्यात आले. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन झालेल्या या भीषण हत्याकांडावर आधारित 'मानवत मर्डर' केस हा वेब सिरीज सोनी लिव्ह या ओटीटीवर प्रवाहित झाली आहे.
मानवत हत्याकांडातील सगळ्यांचे मृतदेह सापडले तेव्हा त्यांची अवस्था भीषण होती. मुली आणि महिलांच्या गुप्तांगावर जखमा होत्या आणि एका चिमुरडीचं तर मुंडकं कापून टाकण्यात आलं होतं. यामध्ये काहींची बोटं छाटण्यात आली होती तर काहींच्या छातीचं मांस कापण्यात आलं होतं. एका मांत्रिकानं दिलेल्या सल्लायवरुन हे कृत्य गावातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या दांपत्यानं केल्याचं तपासात उघड झालं होतं. या हत्याकांडाचे प्रतिसाद त्याकाळी विधानसभेतही उमटले होते. तत्कालिन गृहमंत्री शरद पवार यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीआयडी आणि इतर वरिष्ठ अधिकारी मानवतला पाठवले होते. याबाबत स्वतः शरद पवार यांनी या घटनेचं स्मरण करताना हा संपूर्ण तपास कसा झाला याचा उलगडा केला होता. याबद्दल मानवत मर्डर्सचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, "१९७२ साली जेव्हा मानवत हत्याकांड झालं, तेव्हा तत्कालीन गृहराज्य मंत्री शरद पवार जी ह्यांनी DCP रमाकांत कुलकर्णींवर ही केस सोपवली.जवळपास पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या या घटनाक्रमाला उजाळा देत मा. शरद पवारजींनी सुपरकॉप रमाकांत कुलकर्णी आणि या मानवत केसच्या आठवणीं सांगितल्या."