कोलकाता Mithun Chakraborty Hospitalised : ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना कोलकात्यात शूटिंग सुरू असताना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांना शूटिंग दरम्यान अचानक छातीत कळ आली होती. अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरू झाले असले तरी त्यांची आता तब्येत कशी आहे याबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहते विचारपूस करत असून ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही करत आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांना अलिकडेच प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, ''हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो. ही एक अतिशय आश्चर्यकारक आणि वेगळी अनुभूती आहे. मला खूप बरे वाटत आहे.इतकं प्रेम आणि आदर दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांना समर्पित करत आहे. हा पुरस्कार माझ्या जगभरातील चाहत्यांसाठी आहे ज्यांनी मला निस्वार्थ प्रेम दिले आहे. माझा हा पुरस्कार सर्व हितचिंतकांना जातो.''