मुंबई : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी 2019-20 या आर्थिक वर्षात बँकेचं ऑडिट करणाऱ्या सीएला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी बोलावलं आहे. याशिवाय 2019-20 या आर्थिक वर्षापासून 5 वर्षांचा ऑडिट रिपोर्ट देखील प्राप्त झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बँकेतील 122 कोटी रुपयांची रक्कम गेली कुठे : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांची रक्कम कुठं गेली, याचा तपास करण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संजय राणे व असोसिएट या फर्मचे अभिजित देशमुख यांना समन्स बजावण्यात आला. त्यांना 20 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यात येईल. तसेच ऑडिट रिपोर्टबाबत विचारपूस करण्यात येईल. बँकेचे ऑडिट रिपोर्ट वेगवेगळ्या फर्मनं केले आहेत. तपासात त्यांची देखील चौकशी करण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आरबीआयच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार : या प्रकरणात अधिक माहितीसाठी आर्थिक गुन्हे शाखेनं आरबीआयच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. आरबीआयकडून इंटर्नल रिपोर्ट मागितला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्या दिवशी जनरल मॅनेजर हितेश मेहता याच्या कबुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्यांचाही जबाब नोंदवण्यात येईल, असं आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
माजी सीईओचा नोंदवला जबाब : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भुवन याचादेखील जबाब नोंदवण्यात आला आहे. तो 2019 पासून या पदावर होता. त्याचा 5 वर्षांचा करार होता. तो संपल्यानंतर त्याच्या फेर नियुक्तीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गरज भासल्यास फॉरेन्सिक ऑडिट : 122 कोटी रुपयांचं काय केलं, ते पैसे कोणाला दिले, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या प्रकरणात ऑडिट रिपोर्ट महत्वाचे आहेत. त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तपासात पुढं गरज भासल्यास फॉरेन्सिक ऑडिट करू, असंही या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
हेही वाचा :