मुंबई - Karan Singh Grover :बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता करण सिंग ग्रोव्हर त्याच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळं जास्त चर्चेत असतो. करणनं आत्तापर्यंत तीन वेळा लग्न केलं आहे. त्याची पहिली दोन लग्न अयशस्वी ठरली होती. दरम्यान करणनं बिपाशा बसूबरोबर 8 वर्षांपूर्वी लग्न केलं आणि आता या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. अनेकदा हे जोडपे आपल्या मुलीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता करणची एक मुलाखत व्हायरल होत आहे. यात तो त्याच्या दोन अयशस्वी विवाहांबद्दल बोलताना दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया या संदर्भात त्यानं काय म्हटलं आहे.
करण सिंग ग्रोव्हरनं घटस्फोटाबद्दल केलं भाष्य :करण सिंग ग्रोव्हरनं घटस्फोटांवर मौन सोडताना म्हटलं, "ब्रेकअप आणि घटस्फोट यात काहीही चांगलं नाही. होय, नंतर जेव्हा लोक पुढे जातात तेव्हा त्यांना समजतं की, हे चांगल्यासाठीच घडलं आहे. ही चांगली गोष्ट आहे पण मला माझ्या आयुष्यात घडणाऱ्या फालतू गोष्टींबद्दल कोणाशीही बोलण्याची गरज भासली नाही. लोक मला आयुष्यात घडणाऱ्या फालतू गोष्टींबद्दल विचारतील अशी मी अपेक्षा करत नाही. यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "मला प्रेम आणि आनंद द्यायचा आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मला वाटतं की प्रत्येकजण त्यांच्या गोपनीयतेला पात्र आहे."