मुंबई Paris Olympic 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं मंगळवार 6 ऑगस्ट रोजी इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी ती पहिली महिला भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. विनेशनं उपांत्य फेरीच्या सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. विनेश आता बुधवारी 7 ऑगस्ट रोजी रात्री अंतिम फेरीत अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँडशी सुवर्णपदकासाठी झुंज देईल. आता प्रत्येक भारतीयाला तिच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान विनेशच्या विजयानंतर प्रत्येक भारतीय खूप आनंदी आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्यावर अभिनंदानाचा वर्षाव करत आहेत.
कंगना रणौतचं विनेश फोगटबाबत वादग्रस्त विधान : अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघाची खासदार कंगना रणौतनं विनेशचं अभिनंदन न करता तिची सोशल मीडियाच्या माध्यामातून खरडपट्टी काढली आहे. कंगनानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विनेशचा एक फोटो शेअर करुन एक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये तिनं लिहिलं, "फिंगर क्रॉस, भारताच्या पहिल्या सुवर्णपदकासाठी...विनेश फोगटनं एकदा एका निषेधात भाग घेतला होता, जिथं तिनं मोदीविरोधी घोषणा दिल्या. तरीही तिला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आणि सर्वोत्तम प्रशिक्षण आणि प्रशिक्षक देण्यात आले. हे लोकशाहीचं सौंदर्य आणि एका महान नेत्याची ओळख आहे." कंगनानं विनेशच्या जिंकण्याचं पूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे.