मुंबई - 'केजीएफ' ( KGF) या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच एक रहस्यमय पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर पाहून चाहते उत्सुक आणि संभ्रमात आहेत की हा कुठला प्रोजेक्ट आहे. नुकतेच होंम्बाले फिल्म्सनं प्रभासबरोबर तीन मेगा प्रोजेक्ट्सची घोषणा केली होती, ही त्यापैकी एकाची किंवा अन्य प्रोजेक्टची घोषणा असू शकते, असा आता अनेकजण अंदाज लावत आहे, उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी या चित्रपटाबाबत एक मोठा खुलासा होणार आहे. होंम्बाले फिल्म्सनं जारी केलेल्या पोस्टरमध्ये फक्त एक हात दिसत आहे, जो पौराणिक चित्रपटातील दृश्य असल्याचं दिसून येत आहे.
होंम्बाले फिल्म्सनं शेअर केलं नवीन पोस्टर : होंम्बाले फिल्म्स निर्मात्यांनी पोस्टर शेअर करताना यावर लिहिलं, 'जेव्हा विश्वासाला आव्हान दिले जाते, तेव्हा ते प्रकट होतात. पहिली झलक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:33 वाजता.' ही घोषणा अधिकृत असली तरी हे पोस्टर कोणत्या चित्रपटाचे आणि अभिनेत्याचे आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबरला दुपारी याबाबत चाहत्यांना माहिती मिळेल. मात्र आता सोशल मीडियावर हा हात प्रभास असल्याचे म्हटले जात आहे. आता अलीकडेच 'सालार' आणि 'केजीएफ' निर्माते होंम्बाले फिल्म्सनं 8 नोव्हेंबर रोजी प्रभासच्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली होती.