मुंबई - Happy Birthday Sonu Sood : 'गरीबांचा मसिहा' म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद आज 30 जुलै रोजी त्याचा 51वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनू सूद हा 'खरा हिरो' असल्याचं त्याचे अनेक चाहते म्हणतात. त्यानं कोविड -19मध्ये अनेक लोकांची मदत केली होती. कोविड -19 मुळे जेव्हा देशात हाहाकार माजला होता, तेव्हा सोनू सूदनं मदतीचा हात देऊन अनेकांचे प्राण वाचवले होते. आजही सोनूच्या घराजवळ मदत मागणाऱ्यांची गर्दी जमते. त्यानं चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. अभिनेता असून देखील तो साधा राहतो आणि सामाजिक कामांमध्ये मदत करतो.
सोनू सूदचा प्रवास : 30 जुलै 1973 रोजी सोनूचा जन्म पंजाबमधील मोगा येथे झाला. त्याचे वडील शक्ती सूदचं कपड्यांचं दुकान होतं आणि आई सरोज सूद या शिक्षिका होत्या. सोनूची बहीण मोनिका ही वैज्ञानिक आहे. याशिवाय सोनू सूदनं देखील इंजीनियरिंग केलंय. त्यानं कॉलेजच्या दिवसात मॉडेलिंग सुरू केली होती. 1996 मध्ये वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सोनूनं आंध्र प्रदेशातील सोनाली श्रीधरशी लग्न केलं. दोघांची भेट अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली होती. 1999 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी सोनूनं 'कल्लाझागर' या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. 2002 मध्ये, सोनूनं 'शहीद-ए-आझम' या देशभक्तीपर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2004 मध्ये त्यानं 'युवा' चित्रपटात अभिषेक बच्चनच्या भावाची भूमिका साकारली होती. यानंतर, 2005 मध्ये, 'आशिक बनाया आपने' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाद्वारे त्यानं प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपटानंतर त्याला बॉलिवूडमध्ये एक ओळख मिळाली. यानंतर तो 'जोधा अकबर', 'दबंग, 'सिंग इज किंग', 'हॅपी न्यू इयर', 'सिम्बा' या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसला. साऊथ आणि बॉलिवूडमध्ये सोनूनं अभिनेता आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. सोनूनं एमटीव्ही रोडीज सीझन 19 आणि 20 मध्ये जज म्हणून काम केलंय.