कान्स- 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवात गुरुवारचा दिवस भारतासाठी खास ठरला. चिदानंद एस नाईक यांच्या 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो' या लघुपटाला 'ला सिनेफ'मध्ये सर्वोच्च पारितोषिक मिळालं आहे. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या टेलिव्हिजन विभागातील एका वर्षाच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी म्हैसूरच्या फिजिशियन असलेल्या चित्रपट निर्मात्याने हा प्रकल्प हाती घेतला होता. हा चित्रपट कन्नड लोककथेवर आधारित कोंबडा चोरणाऱ्या वृद्ध स्त्रीवर केंद्रित आहे.
बातमी शेअर करताना FTII ने त्यांच्या अधिकृत X हँडलवर लिहिलंय: "'FTII ने भारतासाठी मोठा सन्मान आणला आहे. आमच्या विद्यार्थ्यांचा 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो हा चित्रपट 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ला सिनेफ पुरस्काराचा विजेता ठरला आहे. दिग्दर्शक चिदानंद एस नाईक यानं 23 मे 2024 रोजी कान्स येथे हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवला आहे."
या वर्षी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या फिल्म इन्स्टीट्यूटच्या दिग्दर्शन अभ्यासक्रमातील एक नव्हे तर तीन प्रतिभावान माजी विद्यार्थ्यांचे काम पाहायला मिळालं. त्यांच्या निर्मितीपैकी एक असलेल्या 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' या चार FTII विद्यार्थ्यांनी एक लघुपट 'ला सिनेफ' स्पर्धात्मक विभागात झळकला होता. चिदानंद एस नाईक दिग्दर्शित हा लघुपट कान्स 2024 मध्ये ला सिनेफ विभागातील स्पर्धेत बक्षिसांसाठी इतर 17 शॉर्ट्सशी स्पर्धा केली आणि वेजेतेपदावर आपलं नाव कोरलं.