मुंबई - 'द ग्रेटेस्ट रिव्हलरी' हा माहितीपट लवकरच नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक विरोधी संघातील जिंकण्यासाठीची चुरस पाहायला मिळेल. अलीकडेच, नेटफ्लिक्स इंडियानं याची झलक दाखवणारं एक पोस्टर जारी केलंय आणि या माहितीपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर केलीय. पोस्टर पाहून भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आनंदीत झाले आहेत. हा माहितीपट सचिन आणि सेहवागच्या जोडीवर केंद्रित असेल आणि याची जादू लोक स्क्रिनवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
माहितीपट कधी प्रदर्शित होईल?
नेटफ्लिक्स इंडियानं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'द ग्रेटेस्ट रिव्हलरीचे' पोस्टर शेअर केलं आहे. "७ फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग होणाऱ्या 'द ग्रेटेस्ट रिव्हलरी: इंडिया विरुद्ध पाकिस्तान' या मालिकेतील एका महान वारशाचा थरार पुन्हा अनुभवा", असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय.
ही आहे नेटिझन्सची प्रतिक्रिया
या माहितीपटाची घोषणा होताच, क्रिकेट आणि चित्रपट प्रेमींनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांचा उत्साह व्यक्त करायला सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यातील अनेक थरारक खेळी, दिग्गज फलंदाजांची विक्रमी फटकेबाजी, सर्व शक्ती पणाला लावून केलेलं क्षत्ररक्षण आणि तोफगोळ्या प्रमाणं केलेला गोलंदाजीचा अचूक मारा यातून पुन्हा पाहायला मिळणार असल्याबद्दल चाहते समाधानी आहेत. दोन देशातील ही चुरस पाण्यासाठी, स्पर्थेची चुरस पुन्हा अनुभवण्यासाठी लोक उत्सुक असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियावरुन दिसत आहे.
माहितीपटात काय आहे?
भारतामध्ये करोडो लोक क्रिकेटचे चाहते असले तरी भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट स्पर्धा खूप खास असते. या दोन्ही देशातील स्पर्धा 'करो वा मरो' अशीच असते. आता नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेटेस्ट रिव्हलरी: इंडिया विरुद्ध पाकिस्तान' हा माहितीपट ही भावना पुन्हा एकदा जागी करणार आहे. आणखी मनोरंजक गोष्ट म्हणजे, आधी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये या माहितीपटाची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. यावरून दिसतं की ही डॉक्युमेंटरी केवळ खेळावर केंद्रित न होता दोन देशातील राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक मुद्द्यांवर प्रकाश टाकेल.