कोल्हापूर : एचआयव्ही (HIV) बधितांकडं पाहण्याचा समाजाचा वेगळा दृष्टीकोण दिसून येतो. एचआयव्ही बधितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एनकेपी प्लस संस्थां कार्यरत आहे. या संस्थेच्या मदतीनं बाधितांच्या 47 निगेटीव्ह पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात प्रशासनाला यश आहे.
गरुड भरारी घेण्याचं स्वप्न : कुणाला आईच्या गर्भातून जीवघेण्या रोगाची लागण तर कोणी जगात येतानाचा पहिला श्वासच एड्सबाधिताचा पाल्य म्हणून घेतलेला असतो. तर रक्ताचं नातं असणाऱ्यांनी झिडकारलं, कोणी फेकून दिलं. मात्र जगण्याची उर्मी कायम ठेवत जन्मताच एड्स बाधिताचा पाल्य म्हणून शिक्का बसलेला. हा शिक्का खोडून काढत जग पादाक्रांत करण्याची गरुड भरारी घेण्याचं स्वप्न या पाल्यांनी बाळगलं आणि त्यातील काहींनी ते पूर्णही केलं.
एड्स बाधितांची पाल्यं आले समाजाच्या मुख्य प्रवाहात : 20 वर्षापूर्वी बाधितांची बालकं आता समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. यातील कोणी डॉक्टर, शिक्षक तर कोणी सैन्य दलात सेवा बजावणार आहेत. जिल्ह्यातील विविध एनजीओसह जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकानं आतापर्यंत 47 जणांच्या जीवनाला जगण्याचे पंख दिलं.
एड्स बाधितांच्या बालकांना जगण्याचा नवा आधार : कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष आणि एड्स बाधितांसाठी काम करणारी एनकेपी प्लस या संस्थेकडं 400 जणांची नोंदणी आहे. यातील कोणी जन्मजातच आई-वडिलांचं छत्र हरपलेली आहेत. तर यापैकी प्राथमिक शिक्षण घेणारी 82, माध्यमिक शाळेत शिकणारे 169, ज्युनियर कॉलेजला 82 तर पदव्युत्तर पदवी आणि बीएमएस सारखी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांची संख्या 47 आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना आई-वडील दोन्हीही बाधित होऊन जगाचा निरोप घेतलेला आहे. अशा पाल्यांना एनकेपी प्लस संस्थेनं बालकांना जगण्याचा नवा आधार मिळवून दिला आहे. यातील अनेकजण आता सर्वसामान्यांसारखे चांगलं आयुष्य जगत आहेत. एड्स बाधितांसाठी एनकेपी संस्थेकडं समग्र नावाचा प्रकल्प सुरू आहे. यातून या कोवळ्या जीवांना आयुष्यात गगनभरारी घेण्याची ताकद अशा उपक्रमातून मिळत आहे, असं जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी दीपा शिप्पुरकर यांनी सांगितलं.
अनिता (बदललेलं नाव) घडवते आहे नवी पिढी : "अनिता जेव्हा जिल्हा नियंत्रण अधिकारी दीपा शिप्पुरकर यांच्याकडं आल्या तेव्हा, त्या गरोदर होत्या. असाध्य रोगाशी झुंज देता देता त्यांच्या पतीची प्राणज्योत मालवली. मात्र गर्भातील निरपराध जीवासाठी जगणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय अनिता यांनी ठरवलं. या लढाईत त्यांच्या सासूंनी त्यांना आधार दिला. प्रसूतीनंतर औषधोपचारामुळं बाळ सुद्धा एचआयव्ही निगेटिव्ह झालं. बारावीचं शिक्षण झाल्यानंतर लग्न झालेल्या अनिता यांनी पुन्हा शिकण्याचा निर्धार केला. बाळासोबत आणि सासूने दिलेल्या प्रेरणेमुळं एम.ए बी.एडपर्यंत शिक्षण पूर्ण करून आता त्या एका शाळेत नवी पिढी घडवत आहेत. त्यांनी पुनर्विवाह केला असून त्यांचं वैवाहिक आयुष्य ही सर्वसामान्यांप्रमाणे सुरू आहे," असं दीपा शिप्पुरकर यांनी सांगितलं.
आई-वडिलांचं छत्र हरपलेली सोनाली (बदललेलं नाव) बनली डॉक्टर : सोनालीच लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं. दोघेही एचआयव्ही बाधित होते. सोनाली निगेटीव्ह होती. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाकडून वेळोवेळी उपचार घेऊन तीही आता सर्वसामान्यांसारखं आयुष्य जगत आहे. मामानं सांभाळ केलेल्या सोनालीनं उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास मनी बाळाला आणि तो पूर्णही केला. नुकतच तिनं बी.ए.एम.एस पदवी मिळवली असून सध्या ती वैद्यकीय क्षेत्रातच पुढचं शिक्षण घेत आहे.
हक्काचा मार्ग निवडा : "2024 वर्षातील एड्स दिनाची थीम 'टेक द राइट पाथ' अशी होती. म्हणजेच एड्स बाधित रुग्णांशी भेदभाव न होता त्यांनीही सर्वसामान्यांसारखं आयुष्य जगलं पाहिजे, यासाठी 'तुमच्या हक्काचा मार्ग निवडा' अशा थीमखाली यंदा जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय काम करत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या थीमनुसार एड्स बाधितांचं आयुष्य सुखर होण्यासाठी हा विभाग सज्ज आहे," असंही दीपा शिप्पुरकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- एचआयव्ही बाधितांसाठी 'हॅपी इंडियन व्हिलेज' म्हणजे स्वर्गच; रवी बापटले यांचं देश एचआयव्ही मुक्त करण्याचं ध्येय
- World AIDS Vaccine Day 2023 : एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी लस आहे एकमात्र उपाय, आतापर्यंत लाखो लोकांचे झाले मृत्यू
- Kidney Donation: आधुनिक काळातील सावित्री! एचआयव्हीग्रस्त पत्नीने केली एचआयव्हीग्रस्त पतीला किडनी दान; जगातील पहिलीच घटना