मुंबई - 'गली बॉय' हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट झोया अख्तरनं दिग्दर्शित केला होता. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा लोकांना तो खूप आवडला होता, आता त्याच्या सिक्वेलची चर्चा जोरात सुरू आहे. या गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, कलाकारांच्या कास्टिंगच्या चर्चेनं जोर धरलाय. यातली विशेष गोष्ट म्हणजे रणवीर आणि आलिया यांची जोडी यात दिसणार नाही पण त्यासाठी एका नवीन फ्रेश जोडीला संपर्क साधला जात आहे.
'गली बॉय'च्या सिक्वेलमध्ये कोण असेल नवी जोडी?
मिळालेल्या माहितीनुसार, 'गली बॉय'च्या सिक्वेलमध्ये विकी कौशल आणि अनन्या पांडे यांच्याशी निर्मात्यांनी संपर्क साधल्याचं सांगितलं जातंय. ही गोष्ट जमून आली तर या नव्या जोडीसह हा सिनेमा पूर्ण होईल. या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची निवड झाल्याचं समजतं. 'खो गये हम कहां' चित्रपटाचे दिग्दर्शक अर्जुन वरैन सिंग 'गली बॉय' या चित्रपटाच्या सिक्वेलचे दिग्दर्शन करतील.
अनन्या पांडेनं 'खो गये हम कहां' या चित्रपटामध्ये अर्जुनबरोबर काम केलं आहे. त्यामुळे 'गली बॉय'च्या सिक्वेलसाठी दिग्दर्शक म्हणून अर्जुन वरैन सिंग परफेक्ट असेल असा विचार निर्मात्यांनी केलाय. या चित्रपटासाठी आधीपासूनच विकी कौशलचा विचार झालेला आहे. चित्रपटाबद्दलचा इतर तपशील गुलदस्त्यात असला तरी कास्टिंगचं काम सुरू झालं आहे.
'गली बॉय' चित्रपटाला मिळाली होती सर्व थरातून प्रशंसा
'गली बॉय' हा २०१९ मध्ये आलेल्या एक म्यूझिकल ड्रामा चित्रपट होता. यामध्ये रणवीर सिंगनं स्ट्रीट रॅपर मुराद ही व्यक्तिरेखा साकारली होती. आलिया भट्टनं त्याची प्रेयसी सफीनाची भूमिका केली होती, तर सिद्धांत चतुर्वेदी एमसी शेरच्या भूमिकेत चमकला होता. याशिवाय या चित्रपटात विजय राज, विजय वर्मा, अमृता सुभाष, कल्की कोचलिन यांनीही विशेष भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचा प्रीमियर बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. चित्रपटाच्या कथेपासून ते संगीत आणि कलाकारांच्या अभिनयापर्यंत, प्रत्येक गोष्टीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाला भारताकडून अधिकृतपणे ऑस्करमध्येही प्रवेश मिळाला होता.
'गली बॉय'नं मुंबई हिप-हॉपला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटानं मुंबईच्या धरावी या झोपडपट्टीचं यथार्थ दर्शन घडवलं होतं.