मुंबई - ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमान आणि त्याची माजी पत्नी सायरा बानो विभक्त झाल्याची बातमी चांगलीच गाजली आहे. लग्नाच्या 29 वर्षानंतर हे जोडपं वेगळं झाल्याच्या बातमीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान ते दोघं विभक्त होण्यामागे त्याच्या बँडमधील एक वादक मोहिनी डे जबाबदार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या. दरम्यान, मोहिनी डेनं खुलासा करत याबाबतीतलं आपलं मौन सोडलं होतं. त्यामुळे रहमानच्या विभक्त होण्यामागचं खरं कारण काय आहे याबाबतीत लोक अंधारात होते. यापार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एआर रहमानची विभक्त झालेली पत्नी सायरा बानो यांनी एका व्हॉईस नोटमध्ये खुलासा केला आहे. गेल्या काही ती शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. यासाठी ती मुंबईत उपचार घेत आहे. त्यामुळं एआर रहमानच्या रिलेशनशिपला ब्रेक दिल्याचं तिनं म्हटलंय.
सायरा बानोची व्हॉईस नोट त्यांच्या वकील वंदना शाह यांनी शेअर केली आहे. व्हॉईस नोटमध्ये सायराने एआर रहमानचं कौतुक केलं आहे आणि लोकांना त्याचे नाव खराब करू नका असं आवाहनही केलं आहे. नोटमध्ये एआर रहमानची पत्नी लोकांना उद्देशून म्हणते, "मी सायरा रहमान आहे. मी सध्या मुंबईत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी शारीरिकदृष्ट्या निरोगी नाही, म्हणून मला एआरपासून वेगळं व्हायचे होतं, त्यामुळे सर्व यूट्यूबर, तमिळ मीडिया, यांना विनंती करते की, कृपया एआर रहमानबद्दल काहीही वाईट बोलू नका. तो एक रत्न आहे, जगातील सर्वोत्तम व्यक्तीपैकी तो एक आहे."
चेन्नई सोडण्याच्या निर्णयाबद्दल सायरा पुढं म्हणाली, "आजारपणामुळं मी चेन्नईतून बाहेर पडले. जर तुम्हाला कळलं की, मी चेन्नईत नाही तर मी कुठं असेन याचा विचार तुम्हाला पडेल. तर, सध्या मी मुंबईत आहे. माझ्यावरील उपचारासाठी मी इथं आली आहे. एआर रहमान कार्यक्रमात बिझी असल्यामुळं तो इथं येणं शक्य नव्हतं. याबद्दल मला कोणालाही त्रास देण्याची इच्छा नव्हती, अगदी मुलांना आणि त्यालाही. म्हणूनच मी इथं एकटीच आले आहे."