मुंबई- ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार एआर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांचा अलीकडेच घटस्फोट झाला. त्यांनी 29 वर्षानंतर आपल्या वैवाहिक जीवनात थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या घोषणेने लोकांना खूप आश्चर्य वाटले, पण चित्रपटसृष्टीत घटस्फोट हे नवं किंवा आश्चर्यकारक नाही. दररोज कोणत्या ना कोणत्या जोडप्याच्या विभक्त झाल्याच्या बातम्या येत असतात. अनेक वेळा आपल्याला विश्वास बसत नाही की, हे जोडपं वेगळं कसं होऊ शकते आणि अनेक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की, असे काय कारण असू शकतं? चित्रपटसृष्टीत सामान्य लोकांपेक्षा जास्त घटस्फोट होतात हे एक कटू सत्य आहे. एआर रहमानच्या वकील वंदना शाह यांनी यावर सविस्तर उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी फिल्मी जगतातील जोडप्यांच्या घटस्फोटामागील प्रमुख कारणे सांगितली आहेत.
फिल्मी जगतात इतके घटस्फोट का होतात? - मुलाखतीमध्ये एआर रहमानशी सायरा बानो यांनी घेतलेल्या घटस्फोटबद्दल विचारण्यात आले. यावर वकिल वंदना शाह म्हणाल्या, "सर्वात पहिली गौोष्ट म्हणजे इथल्या लोकांचं जीवन इतरांहून खूप वेगळं आहे. बहुतेक घटस्फोटामागील कारण फसवणूक असते, असं मला वाटत नाही. बहुतेक विवाह तुटण्याचे पहिले कारण म्हणजे कंटाळा आहे. एका व्यक्तीचा कंटाळा आला म्हणून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याचं एक कारण आहे. दुसरं म्हणजे, बॉलिवूडमधील लोकांच्या लैंगिक अपेक्षा सामान्य लोकांपेक्षा जास्त असतात. तिसरं कारण म्हणजे कुटुंबात दोघांशिवाय कोणीतरी तिसरी व्यक्ती महत्त्वाची असणं, मग ती तिसरी व्यक्ती आई, भाऊ किंवा वडील असू शकते. जसे दक्षिण भारतात एक प्रकरण आहे ज्यात मुलाचा बाप खूप श्रीमंत आहे, तर मुलगा बायकोसमोर सिंह आहे पण वडिलांसमोर फार काही बोलू शकत नाही, तो अगदी मांजरासारखा राहतो. त्यामुळे मुलगी या गोष्टीवर खूश राहत नाही. त्यामुळे विवाह बिघडण्यामागे हेही एक प्रमुख कारण आहे."