मुंबई - Tripti Dimri Exclusive Interview : रणबीर कपूर अभिनित आणि संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'ऍनिमल' मधील रणबीर बरोबरच्या तृप्ती डिमरीच्या इंटिमेट सीन्सची बरीच चर्चा झाली. अनपेक्षितपणे तृप्ती डिमरीच्या पॉप्युलॅरीटीत वृद्धी झाली. तिचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स चार पटीने वाढले. सध्या तृप्ती निर्माते आणि दिग्दर्शकांची फेवरीट झालेली दिसतेय. तिची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' नावाचा चित्रपट येऊ घातलाय. त्या निमित्ताने तृप्ती डिमरीने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत खास संवाद साधला.
'बुलबुल' ची चांगली दखल घेतली गेली होती. 'ऍनिमल' नंतर या 'बुलबुल'ने उंच भरारी घेतली आहे...
(हसते) 'बुलबुल' हा माझ्या करियरचा सुरुवातीचा काळ होता. 'बुलबुल' नंतर लोकांनी माझ्या कामाची दखल घ्यायला सुरुवात केली. मला छान भूमिका ऑफर झाल्या आणि मला ज्या प्रकारची ओळख मिळाली आहे त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. मी अभिनय करायला सुरुवात करताना देवाकडे जी प्रार्थना केली होती ती फलद्रुप होताना दिसतेय. अर्थात अजून खूप लांब पल्ला गाठायचा आहे.
'लैला मजनू', 'ऍनिमल' मध्ये तुमच्या इंटेन्स भूमिका होत्या. 'बॅड न्यूज' सारखा हलकाफुलका चित्रपट तुमच्यापर्यंत कसा पोहोचला?
'बॅड न्यूज' मी ऍनिमल प्रदर्शित होण्यापूर्वी साइन केला होता. माझा 'कला' मधील अभिनय बघून मला धर्मा प्रोडक्शन कडून फोन आला की करण सरांना भेटायचे आहे. त्या दरम्यान त्यांनी धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (DCA) सुरू केले होते आणि त्यांच्या पहिल्या चार टॅलेंटमध्ये ३ मुलांसह एकटी मुलगी मी होते. त्यामुळे त्यादरम्यान त्यांनी मला सांगितले की त्यांनी माझे 'बुलबुल' आणि 'कला' हे चित्रपट पाहिले आहेत आणि मी त्यांच्यासोबत काम करावे अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यावेळी चित्रपटांबद्दल बोललो नव्हतो पण काही महिन्यांनी करण सरांनी मला फोन करून आनंद (तिवारी) सरांशी ओळख करून दिली आणि सुदैवाने त्यांनी माझे दोन्ही चित्रपट पाहिले होते आणि त्यांना ते आवडले होते. मी त्यांचे आभार मानू इच्छिते कारण त्यांनी मला ऑफर केलेली भूमिका अतिशय अनोखी होती. आणि 'बॅड न्यूज' साठी माझ्यावर विश्वास दाखवणे माझ्यासाठी खरोखर महत्वाचे होते. आम्ही कथाकथन केले आणि आम्ही अनेक चित्रपटांमधून अनेक दृश्ये केली आणि त्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स आला की मी ते करू शकते.
खरं तर जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला माझे हसू आवरता येत नव्हते. आमचे दिग्दर्शक आनंद तिवारीचे कॉमिक टाइमिंग अप्रतिम आहे आणि त्याच्याकडे विनोदाची देखील चांगली समज आहे. म्हणूनच मी या जॉनर चा विचार केला कारण मी यापूर्वी कधी कॉमेडी केली नव्हती. मला वाटायचे की हे खूप कठीण आहे. अर्थात कॉमेडी क्रॅक करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात जसे की तुमच्या सहकलाकारासह तुमचे कॉमेडी टाईमिंग, तुमचे समीकरण, अचूक शब्दफेक वगैरे, जर तुम्हाला स्वतःला ते हसण्यासारखे वाटत नसेल तर तुम्ही प्रेक्षकांना हसवू शकता का? या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि सुदैवाने विकी (कौशल), एमी (विर्क), नेहा धुपिया, यांची साथ आणि प्रोत्साहन मिळाले. मी सेटवर सतत हसत असे. आम्ही एकत्र कुटुंबासारखे राहत होतो.