मुंबई fussclass dabhade Marathi Movie : दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांचे चित्रपट हे वास्तववादी असल्यानं, प्रेक्षक त्याच्याशी एकरूप होऊ शकतात. नुकतेच 'झिम्मा' या चित्रपटाचं दोन भाग प्रचंड गाजले होते. हेमंत ढोमे आता आपल्या गावच्या मातीतील चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर 'फसक्लास दाभाडे' या आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट येत्या 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी पाहायला मिळणार आहे. टी-सीरीज, आनंद एल. राय प्रस्तुत, कलर यल्लो आणि चलचित्र मंडळी प्रॉडक्शन निर्मित 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचं लेखन हेमंत ढोमे यांनी केलंय.
'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचं पोस्टर :'फसक्लास दाभाडे'मध्ये क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अजूनही काही कलाकारांची फौज आहे. मात्र त्याच्याबद्दल अद्यापही काही माहिती समोर आलेली नाही. 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, आनंद एल. राय, क्षिती जोग आणि कृष्णा कुमार हे आहेत. चित्रपटाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर ट्रॅक्टरवर बसलेले दिसत आहेत. यात अमेयनं मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. मागे घरही कुठल्यातरी मोठ्या समारंभासाठी सजलेलं दिसत आहे. त्यामुळे या सोनू, पप्पू आणि तायडीची नेमकी काय कहाणी हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी चित्रपटाबद्दल मांडले मत : या चित्रपटाबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी म्हटलं, "हा माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे. मी जे जगलो, जे पाहिलं ते सगळं मी यात मांडायचा प्रयत्न केला आहे. कोणीतरी असं म्हणालं आहे की, सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्याही जवळचा असतो. चित्रपट बनवताना ठरवलं होतं की, हा चित्रपट आपल्या गावीच स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत चित्रीत करायचा आणि विशेष म्हणजे, माझ्या लाडक्या टीमबरोबर, माझी ही इच्छा पूर्ण देखील झाली. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून 15 नोव्हेंबर रोजी हा तुमच्या भेटीला येणार आहे.''
निर्माते आनंद एल राय आणि भूषण कुमार :निर्माते आनंद एल राय यांनी या चित्रपटाबद्दल म्हटलं, "फसक्लास दाभाडे' ही एक अशी कहाणी आहे, जी भावंडांच्या नात्यातील गुंतागुंत सुंदरपणे मांडते. हा अशा बंधनाचा उत्सव आहे, जिथे प्रेम, शत्रुत्व आणि विनोद आनंदीपणे एकत्र राहतात. हेमंत ढोमे यांनी या अनोख्या भावंडांची कहाणी अतिशय मोहकतेनं आणि नातेसंबंधानं जिवंत केली आहे. कलर यलो प्रॉडक्शनच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आणण्याचा मला अभिमान आहे. मला खात्री आहे की, हा चित्रपट अनेकांना जवळचा वाटू शकतो, ज्यानं कधीही भावंडाबरोबर हे विशेष बंध शेअर केले आहेत,"निर्माते भूषण कुमार यांनी म्हटलं, ''फसक्लास दाभाडे' नात्यांमधील मानवी भावनांचे अतिशय साधेपणानं चित्रण करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट त्याच्या मानवी कथानकाद्वारे खोलवर जोडतो. भारतातातील, विशेषतः महाराष्ट्रातील कौटुंबिक जीवन प्रतिबिंबित करणाऱ्या या चित्रपटाची दोलायमान संस्कृती आणि हृदयस्पर्शी कहाणी प्रेक्षकांसमोर दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा घेऊन येणारी आहे.''