मुंबई - Darshan Arrest in Murder Case: कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याचा मित्र, अभिनेता पवित्र गौडा यांचा समावेश असलेल्या रेणुकास्वामी हत्या प्रकरणानं लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तपासात धक्कादायक खुलासे होत आहेत. प्रसिद्ध कन्नड अभिनेता किच्चा सुदीप यानं पीडितेची पत्नी आणि न जन्मलेल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
वेबलॉइडशी नुकत्याच झालेल्या मीडिया संवादादरम्यान, किच्चा सुदीप म्हणाला, "प्रसार माध्यमं आम्हाला काय दाखवत आहेत याची आम्हाला फक्त जाणीव आहे, कारण आम्ही माहिती घेण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जात नाही. असं दिसतं की मीडिया आणि पोलीस सत्य शोधण्यासाठी खूप कष्टाचं काम करत आहेत. ती मुलगी न्यायासाठी पात्र आहे. रेणुकास्वामी हे रस्त्यावर मृत्यमुखी पडले त्यांना न्याय मिळायला हवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचा न्यायावर विश्वास असला पाहिजे आणि या प्रकरणात न्यायाचा विजय झाला पाहिजे."
दर्शनचा थेट उल्लेख टाळून, सुदीपनं या प्रकरणाचा कन्नड चित्रपट उद्योगावर होणारा परिणाम घातक असल्याचं मान्य केलं. तो म्हणाला, "प्रत्येकाला त्या कुंटुंबाबद्दल मनापासून साहनुभूती वाटते. सध्याचं वातावरण चांगलं राहिलेलं नाही. फिल्म इंडस्ट्रीनं न्याय दिला पाहिजे. सगळा दोष यामध्ये फिल्म इंडस्ट्रीला दिला जात आहे. फिल्म इंडस्ट्रीला लागलेला डाग साफ झाला पाहिजे. यामध्ये अनेक कलाकार सहभागी आहेत. दोषींना शिक्षा झाली तर चित्रपटसृष्टीला दिलासा मिळेल."
11 जून रोजी कन्नड अभिनेता दर्शन, पवित्रा गौडा आणि इतरांना चित्रदुर्ग येथून 8 जून रोजी रेणुकास्वामी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. रेणुकास्वामीचं अपहरण करुन त्याचा छळ आणि हत्या केल्याचा आरोप पवित्रा याच्यावर आहे.