मुंबई - 'कंतारा' या चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेला अभिनेता ऋषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज' असं या चित्रपटाचं नाव आहे. संदीप सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. निर्मात्यांनी अलीकडंच या चित्रपटाचं एक लक्षवेधी पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि इतर तपशील जाहीर केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 'ऋषभ'चा नवा लूक
निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीचा लूक समोर आला आहे. छत्रपती शिवाजीच्या लूकमध्ये ऋषभ कमालीचा शांत दिसत आहे. हातात तलवार घेऊन ऋषभ आपल्या पारंपारिक रूपातील शिवाजी महाराजांचे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आमचा सन्मान भारताचा महान योद्धा राजा - प्राइड ऑफ इंडिया: द एपिक गाथा ऑफ छत्रपती शिवाजी महाराज".