मुंबई :साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता याप्रकरणी अल्लू अर्जुनचे अनेक चाहते आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत आहेत. अनेकजण अल्लू अर्जुनला याप्रकरणी पाठिंबा देत आहेत. दरम्यान यावर बॉलिवूड अभिनेता वरुण धवननं मोठे वक्तव्य केलं आहे. वरुणनं म्हटलं की, 'एक अभिनेता सुरक्षितेतशी संबंधित सर्व प्रोटोकॉल स्वत: घेऊ शकत नाही. तुमच्या सभोवताली असणाऱ्या लोकांना सांगण्याचं गरजेचं आहे. घडलेला अपघात खूप वेदनादायी असला तरी, या संपूर्ण प्रकरणासाठी तुम्ही एका व्यक्तीला दोष देऊ शकत नाही.'
अल्लू अर्जुनच्या अटकेवर वरुण धवननं केलं विधान :अभिनेता वरुण धवन हा शुक्रवारी त्याच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनसाठी जयपूरला गेला. यावेळी त्यानं अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत विधान केलं होतं. दरम्यान अल्लू अर्जुनवर 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न कळवता पोहोचल्याचा आरोप लावण्यात आला आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या चित्रपटगृहामध्ये, जेव्हा अल्लू अर्जुन आला, तिथे खूप गर्दी जमली होती. यानंतर तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. चेंगराचेंगरीमध्ये तिथे अनेकजण जखमी झाले, तर एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली होती. यात सध्या चित्रपटगृहाचे मालक आणि तेथेल दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.