अमरावती : बाथरुमच्या टाईल्सवरून घसरून पडण्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. अमरावती शहरातील डॉ. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी बाथरुममधून सुरक्षित बाहेर पडण्याचा पर्याय शोधला आहे. डॉ. व्ही.टी. इंगोले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना कोणता पर्याय शोधला याची सविस्तर माहिती दिली.
कपडे बदलताना अधिक भीती : "बाथरुममध्ये अंतरवस्त्र विशेषतः पायजामा, पॅन्ट आदी घालताना घसरून पडण्याची शक्यता खूप जास्त असते. याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. बाथरूममध्ये ओलसर ठिकाणी कपडे बदलणं अधिक धोकादायक ठरू शकतं," असं डॉ. इंगोले म्हणाले.
असा शोधला पर्याय : बाथरुममध्ये असणाऱ्या कमोडच्या झाकणावर स्वस्त आणि परवडणारी खास उशी डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी बसवली. कमोडच्या झाकणावर ही उशी बसवण्यात आली असून यासाठी कोणत्याही अतिरिक्त जागेची गरज भासत नाही. कमोडच्या सीटवर असणाऱ्या या उशीवर बसून सुरक्षितपणे आंतरवस्त्र बदलता येतात. यामुळं संतुलन गमावून घसरून पडण्याचा धोका टाळता येतो. उशी मऊ असल्यामुळं ती वापरणं सोयीस्कर होतं," असं डॉ. व्ही. टी इंगोले यांनी सांगितलं.
अशी आहे ही उशी : "4 इंच जाडी असणारी 11 इंच बाय 11 इंच चौकोनी उशी बनवली. ही उशी कमोडच्या झाकणावर चिटकवली, तिला कव्हर देखील घातलं. यावर बसून अंतर्वस्त्र काढणं आणि घालणं सोपं होतं. यामुळं बाथरूम ओली असताना देखील मोठा आधार मिळतो. यामुळं घसरून पडण्याची शक्यता अगदी शून्य होते. कमोडच्या झाकणावरच ही उशी बसवल्यामुळं बाथरूममधील कोणत्याही अतिरिक्त जागेची गरज भासत नाही. या पर्यायामुळं बाथरूममध्ये घसरून पडणं या गंभीर समस्येवर मात करता येते," असं डॉ. व्ही. टी. इंगोले म्हणाले.
अशी सुचली कल्पना : "फार पूर्वी माझ्या मित्राचे वडील बाथरुममध्ये घसरून पडले आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट मला सतत खात होती. हे टाळण्यासाठी मला काही करता येईल का असं सतत वाटायचं. त्यामुळं यावर विचार करून मी एक मशीन बनवली. मात्र ती मशीन मोठी असल्यामुळं साध्या बाथरूम बसणं अशक्य होतं. तरीसुद्धा या संदर्भात माझे विचार सतत सुरू होते. आता कमोडवरच उशी बसवण्याची सोपी कल्पना समोर आली. ही कल्पना आधुनिक वेस्टर्न कमोडसाठी सहज राबवता येते. कोणत्याही मोठ्या बदलांशिवाय सुरक्षेचं महत्व ती अधोरेखित करते. बाथरूममधील सुरक्षिततेसाठी ही साधी जोडणी अत्यंत सुरक्षित आहे," असं डॉ. व्ही. टी इंगोले यांनी सांगितलं.
हेही वाचा