मुंबई - संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अटक केल्यानंतर अभिनेत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. या प्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
अंतरिम जामीन मंजूर झाल्यानं अल्लू अर्जुनला थोडा दिलासा - संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी त्याला आज शुक्रवारी अटक करण्यात आली होती. न्यायालय त्याला 'बेल की जेल' देणार याची प्रतीक्षा सुरू होती. अखेर नामपल्ली कोर्टानं अल्लू अर्जुनला जामीन देण्यास नकार दिला. परंतु उच्च न्यायालयाकडून त्याला अंतरिम जामीन मंजूर झाल्यानं थोडासा दिलासा मिळाला आहे.
मयत रेवतीच्या पतीनं तक्रार मागं घेतली - संध्या थिएटरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्या महिलेचा नऊ वर्षांचा मुलगाही जखमी झाला होता. मयत महिला रेवतीचा पती याच्या तक्रारीवरुनच पहिल्यांदा अल्लू अर्जुनच्या विरोधात तक्रार दाखल झाली. परंतु आज त्यानं न्यायालयात आपली अल्लू अर्जुनबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं आणि तक्रार मागेे घेत असल्याचंही म्हटलं.
या प्रकरणात अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले असून अल्लू अर्जुनवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अल्लू अर्जुन तुरुंगात शिफ्ट होण्यापूर्वी अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद आणि भाऊ शिरीष त्याच्याबरोबर होते. दिग्दर्शक त्रिविक्रम देखील अल्लू अर्जुनला भेटायला आले होते.
अल्लू अर्जुन किंवा थिएटरयापैकी कोणीही अल्लू संध्या थिएटरमध्ये येणार असल्याचं कळवलं नव्हतं असा दावा पोलिसांनी केला. परंतु हा दावा फोटाळण्यात आला. संध्या थिएटरनं पोलिसांना सादर केलेल्या पत्राची प्रत सादर केली. यामध्ये पुष्पा चित्रपटातील कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे रात्री 9:30 वाजता थिएटरला भेट देण्याची योजना असल्याचा स्पष्ट उल्लेख होता.
पोलिसांनी अल्लू अर्जुनला नामपल्ली न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी त्याला 9व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. यावेळी कोर्ट हॉल खचाखच भरला होता. माध्यामांचे प्रतिनिधी आणि चाहते यांनी कोर्टात आणि कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. कोर्ट परिसराला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. हैदराबाद शहरात अनेक ठिकाणी पोलीस संतर्क झाले आहेत.
अल्लू अर्जुनला राजकीय हेतूनं अटक झाल्याची टीका सरकार विरोधी नेत्यांकडून सुरू झाली आहे. कायद्याच्या मार्गानं यात तपास होईल असं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलंय. कायदा सर्वांसाठी समान असल्याचंही त्यांनी म्हटलंय. परंतु बीआरएस नेता केटीआर आणि भाजपा नेता बंदी संजय यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.