मुंबई : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी आज (13 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी दादर पूर्वेला असलेल्या 80 वर्षांपूर्वी हमालांनी बांधलेल्या हनुमान मंदिराला हटवण्याबाबत रेल्वे प्रशासनानं नोटीस पाठवल्याचं म्हटलं. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच या मंदिराचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं आता या मंदिराबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराचा इतिहास : मंदिराच्या परिसरातील स्थानिक रहिवासी, मंदिराचे पूजारी आणि व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी या ठिकाणी एक झाड होतं. या झाडापाशी इथे काम करणाऱ्या हमालांना हनुमंताची एक पुरातन मूर्ती सापडली. त्यानंतर या मूर्तीसाठी एक मंदिर बांधण्यात आलं आणि या मूर्तीची मंदिराच्या गाभार्यात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. काही कारणास्तव ज्या झाडापाशी ही पुरातन मूर्ती सापडली ते झाड तोडण्यात आलं. मात्र, मंदिराच्या विश्वस्त मंडळानं त्या झाडाचं खोड आजही जतन केलं आहे. इथल्या हमालांना हनुमानाची पुरातन मूर्ती सापडल्यानं आणि हमालांनीच मारुतीरायाचं मंदिर उभारलं त्यामुळं या मंदिराला "हमालांनी बांधलेलं मंदिर" असं म्हटलं जातं.
मंदिराची अडचण होण्याचं कारण काय? : दादरच्या मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या प्लॅटफॉर्म नंबर 12 ला लागूनच हे 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर असून, इथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिरात येणारे 82 वर्षीय भाविक विनायक नाईक यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, "मी 1960 पासून या मंदिरात येत आहे. आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की, हे मंदिर हमालांनी बांधलं आहे. मी या मंदिरात रोज येतो, देवाला नमस्कार करतो, थोडावेळ बसतो आणि पुन्हा घरी जातो. हा माझा नित्यक्रम आहे. इतक्या वर्षात रेल्वे प्रशासनाला या मंदिराची अडचण झाली नाही. मात्र, आत्ताच या मंदिराची अडचण होण्याचं कारण काय? या मंदिरामुळं तुम्हाला कोणता त्रास होत आहे का?," असा प्रश्न 82 वर्षे श्रद्धाळू नाईक यांनी विचारला आहे.
मंदिर तोडू देणार नाही : "आज हे मंदिर हजारो प्रवाशांचं, भाविकांचं श्रद्धास्थान आहे. उद्या जर रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी हे मंदिर तोडायला आले, तर सर्वात पुढे आम्ही असू. आम्ही हे मंदिर तोडू देणार नाही," असा इशारा विजय नाईक यांनी दिला आहे. दरम्यान, या मंदिराला मध्य रेल्वेच्या सहाय्यक विभागीय अभियंता भायखळा कार्यालयातून नोटीस बजावण्यात आली असून, 4 डिसेंबर रोजी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये सदर मंदिराला 7 दिवसांचा अवधी देण्यात आला असून, 7 दिवसात विश्वस्त मंडळांनी मंदिर पाडलं नाही, तर रेल्वे प्रशासनाकडून हे मंदिर पाडलं जाणार आहे. या कामासाठी जो काही खर्च येईल, तो खर्च देखील या विश्वस्त मंडळाकडून घेतला जाईल, असा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा