हैदराबाद - 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनला हैदराबादच्या चिकडपल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई सुरू झाली आहे. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुन आणि त्याची 'पुष्पा' टीम अडचणीत सापडली होती. हे प्रकरण घडल्यानंतर आतापर्यंत संध्या थिएटर आणि पुष्पा टीमशी संबंधित तिघा जणांना अटक झाली आहे.
अल्लू अर्जुनच्या घरी आज सकाळी पोलीस दाखल झाले. त्यानं पोलिसांशी सहकार्य करण्याची भूमिका आधीच घेतल्यानं त्याला ताब्यात घेताना काहीही विरोधाचा प्रकार घडला नाही. तो पोलिसांच्या गाडीतून चिकडपल्ली स्टेशनला पोहोचल्यानंतर त्याचा जबाब पोलिसांनी घेतला. त्याला आज नामपल्ली कोर्टात उभे केले जाणार आहे. यामध्ये त्याला जामीन मंजूर होतो की काही काळ तरुंगवास भोगावा लागतो याची निर्णय थोड्याच वेळात होईल.
दरम्यान, अल्लू अर्जूनला नामपल्ली कोर्टात हजर करण्यापूर्वी हैदराबादच्या गांधी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. इथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्या रिपोर्टसह त्याला पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत. अल्लू अर्जुनची सिकंदराबादच्या गांधी रुग्णालयात बीपी, शुगर आणि कोविड टेस्ट पार पडली. त्याच्या टेस्ट नॉर्मल आल्या आहेत. त्याची ईसीजी टेस्टही करण्यात आली. सुरक्षेच्या कारणानं त्याला रुग्णालयाच्या सुपरिटेंडंटच्या दालनात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी गांधी रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी मोठ्या संख्येनं अल्लू अर्जुनचे चाहते हजर राहून त्याला पाठिंबा दर्शवत होते. दरम्यान, अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चित्रपट विश्वात खळबळ उडाली आहे. या काळात त्याच्या पत्नीला धीर धेण्यासाठी स्वतः चिरंजीवी त्याच्या घरी दाखल झाला आहे.
4 डिसेंबरच्या रात्री अल्लू अर्जुन उपस्थित असलेल्या प्रीमियर शोदरम्यान संध्या चेंगराचेंगरी प्रकरणात एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेत त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध कलम 105, 118(1), r/w 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिलेच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून ५ डिसेंबर रोजी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्लू अर्जुनच्या अगोदर हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कोणतीही सूचना नव्हती. थिएटर व्यवस्थापनानेही गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केलेली नव्हती.