हैदराबाद - अल्लू अर्जुन राजकारणात उतरणार असल्या चर्चा काही तासापूर्वीपर्यंत सुरू असतानाच तो राजकारणात उतरणार नाही असं पत्रक त्याच्या टीमनं प्रसिध्द केलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासात त्याला तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी त्याच्यावर पोलिस कारवाई झाल्याचं आपल्याला माहिती आहे. परंतु अल्लू अर्जुन हा आज तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला सर्वात मोठा लोकप्रिय अभिनेता आहे. दक्षिणेत नेहमीच कलाकार राजकारणात वरचढ ठरले आहेत. यापार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनवर पोलिसांनी कारवाई सुरू करताच तेंलगणाच्या राजकारणातही नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
We kindly request media outlets and individuals to refrain from spreading unverified information. For accurate updates, please rely on official statements from our official handle. pic.twitter.com/Qd2nmL5Bhg
— Team Allu Arjun (@TeamAAOfficial) December 12, 2024
अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेताच तेलंगणाचे विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यापैकी एक असलेले आमदार केटीआर यांनी प्रतिक्रिया देऊन सध्याच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे.
Arrest of National Award winning star Allu Arjun is the pinnacle of insecurity of the rulers!
— KTR (@KTRBRS) December 13, 2024
I totally sympathize with the victims of the stampede but who failed really?
Treating @alluarjun Garu as a common criminal is uncalled for especially for something he isn’t directly… pic.twitter.com/S1da96atYa
"राष्ट्रीय पुरस्कार विजेता स्टार अल्लू अर्जुनची अटक म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या असुरक्षिततेचा कळस!, असल्याचं केटीआर यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया हँडलवर म्हटलंय. पुढे केटीआर यांनी सवाल केलाय की, "चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांबद्दल मला पूर्णपणे सहानुभूती आहे पण खरोखर कोण अपयशी ठरले? ज्या गोष्टीसाठी तो जबाबदार नाही अशा अल्लू अर्जुनला गुन्हेगारासारखं वागवलं जात आहे. असं म्हणत त्यांनी रेवंत रेड्डी सरकारवर जोरदार हल्ला बोल केला आहे. खरंतर वर अल्लू अर्जुनला जसं जबाबदार धरलं जातंय त्याच तर्कानं दोन निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल रेवंत रेड्डी यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही केटीआर यांनी केली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी सांगितलं की, लोकप्रिय चित्रपट अभिनेता अल्लू अर्जुनच्या अटकेसंदर्भात कायदा स्वतःच्या मार्गानं शोध घेईल. यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका राहणार नाही आणि कायद्यापुढे सर्व समान असतील.
अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. अल्लू अर्जुन निर्दोष असल्याचा आणि जाणीवपूर्वक त्याला त्रास देण्याचा प्रयत्न सकरकार करत असल्याचा सूर चाहत्यांमधून उमटताना दिसत आहे. अलीकडेच संध्या थिएटरच्या वतीनं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं. यामध्ये अल्लू अर्जुन 4 तारखेला हजर राहणार होता त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेबद्दल पोलिसांना कळवल्याचं म्हटलं आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, थिएटर व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कोणतीही सूचना नव्हती. थिएटर व्यवस्थापनानेही गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केलेली नव्हती.
दरम्यान, चेंगराचेंगरीची घटना हे सरकारचे पूर्ण अपयश असल्याचं भाजपा नेते बंदी संजय यांनी म्हटलंय. अल्लू अर्जुनला मान द्यायला हवा. त्याला गुन्हेगार म्हणून पाहू नका असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेला अल्लू अर्जुन जबाबदार नसल्याचं सांगत भाजप आमदार राजसिंग यांनी अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला आहे.