मुंबई - भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबर रोजी होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नवीन मंत्र्यांना नागपुरात एका समारंभात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी आज दिली. यावेळी सुमारे ३० मंत्री शपथ घेतील, असं भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं पीटीआयला सांगितलं आहे.
राज्य विधिमंडळाचं आठवडाभर चालणारं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून महाराष्ट्राची उप राजधानी नागपुरात सुरू होणार आहे. 5 डिसेंबर रोजी मुंबईत एका भव्य समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात.
राज्यपाल सी पी राधाकृष्ण हे रविवारपासून मंगळवारपर्यंत अधिवेशनानिमित्तानं नागपुरात असणार आहेत. ते रविवारी किती वाजता नागपूरला पोहोचतील याबाबत अजून कार्यक्रम निश्चित झालेला नाही. यासंदर्भात उद्या शनिवारी सकाळी निश्चित माहिती मिळण्याची शक्यता आहे. तर १९ तारखेचा त्यांचा नागपुरातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशीही माहिती मिळत आहे. याचाच अर्थ राज्यपाल आता १५, १६ आणि १७ तारखेला नागपुरात असणार आहेत.
नागपूरमध्ये नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी रॅली रविवारी सकाळी ११ वाजता निघणार आहे. ही रॅली साधारण ३ तास चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता रविवारी दुपारी ४ वाजता नागपूर राजभवन येथे शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार असं जवळ-जवळ निश्चित होतं. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका तसंच दिल्ली दौरेही झाले आहेत. त्यामुळे १५ तारखेला राज्याला नवीन मंत्रिमंडळ मिळेल अशी अपेक्षा आहे.