मुंबई - Madhusudan Kalelkar Birth Centenary : नामवंत लेखक, नाटककार, गीतकार, पटकथाकार, नाट्य आणि चित्रपट निर्माता यासारख्या नानाविध भूमिकातून रसिकांचं रंजन करणारे दिवंगत मधुसूदन कालेलकर यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. 22 मार्च 2024 रोजी त्यांची 100 वी जयंती आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचं आयोजन 19 मार्च ते 22 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. या कालावधीत मधुसूदन कालेलकरांनी लिहिलेल्या तीन गाजलेल्या नाटकांचं सादरीकरण आजच्या पिढीतील सर्जनशील रंगकर्मी आणि रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
मुंबईतील श्री शिवाजी नाट्य मंदिरात 19 ते 21 मार्च या कालावधीत रोज संध्याकाळी 7 वा नाटकाचे प्रयोग सादर होतील. पहिल्या दिवशी 19 मार्चला 'दिवा जळू दे सारी' रात, 20 मार्च रोजी 'डार्लिंग डार्लिंग' आणि 21 मार्च रोजी 'नाथ हा माझा' हे नाट्य प्रयोग होतील. तर 22 मार्च रोजी मधुसूदन कालेलकर लिखीत गाजलेल्या गीतांचा सांगितीक कार्यक्रम होईल. यामध्ये त्यांच्या 'सूर तेच छेडिता', 'सांग कधी कळणार तुला' यासारख्या मधुर भावगीतांपासून ते अनेक लोकप्रिय चित्रपट गीते ते 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई'सारख्या अंगाई गीतापर्यंतचा समावेश असू शकतो.
मधुसूदन कालेलकरांचा जीवन प्रवास अतिशय खडतर होता. 22 मार्च 1924 रोजी वेंगुर्ल्यात जन्मलेल्या कालेलकरांना लेखनाचा वारसा आई वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडिल अनंतराव कालेलकर हे वृत्तपत्रासाठी लेख लिहायचे, आई अहिल्याबाईही तत्कालीन नामवंत मासिकातून लेखन करायच्या. लहानपणीच मधुसूदन यांनी नाटककार बनायचे ठरवले आणि वेंगुर्ल्यापासून सुरू झालेला त्यांचा हा कलाप्रवास कोल्हापूर मार्गे मुंबईपर्यंत झाला. नोकरी करत असतानाच त्यांनी नाटकं लिहिली. त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव होता, त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पहिल्या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगासाठी जयप्रकाश नारायण स्वतः उपस्थित राहिले होते. मराठी रंगभूमीवरुन सुरू झालेल्या त्यांचा यशस्वी प्रवास मराठी चित्रपटाचे गीतकार, लेखक, पटकथाकार आणि निर्माता म्हणून सुरू राहिला. हिंदीमध्येही ते प्रथितयश लेखक आणि पटकथाकार बनले. संजीवकुमार, शम्मी कपूर, देव आनंद, अमिताभ बच्चनपासून अनेक आघाडीच्या नायकांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं. त्यांच्या या उत्तुंग कारकिर्दीमध्ये दिवंगत मधुसूदन कालेलकर यांनी 33 नाटके, 111 हिंदी आणि मराठी चित्रपटांचे लेखन, आणि 70 चित्रपटांसाठी गीतकार म्हणून त्यांनी काम केलं आहे.
मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सव निमंत्रण पत्रीका दिवंगत मधुसूदन कालेलकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांचा या सर्व सर्जनशील प्रतिभेला जाणून घेण्याचा, त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत कालेलकरांचे पुत्र अनिल मधुसूदन कालेलकर, प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आठल्ये, विजय राणे, मनोहर सरवणकर तसेच सांस्कृतिक कार्य संचालनाचे संचालक, बिभीषण चवरे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी संगीतरसिकांना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा -
- SRK teaches Ed Sheeran : शाहरुख खानने गायक एड शीरनला शिकवली त्याची आयकॉनिक सिग्नेचर पोज, पाहा व्हिडिओ
- Bastar the naxal story : 'बस्तर-द नक्सल स्टोरी' स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दोनदा वीज खंडित झाल्यानं जेएनयूमध्ये गोंधळ
- Laapataa ladies : सलमान खाननं किरण रावचं 'लापता लेडीज'साठी केलं कौतुक